रिटायर्ड गुरुजी पुन्हा शाळेत ! अहमदनगर जिल्हा परिषदेत 350 जणांची होणार नियुक्ती | पुढारी

रिटायर्ड गुरुजी पुन्हा शाळेत ! अहमदनगर जिल्हा परिषदेत 350 जणांची होणार नियुक्ती

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा  : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने काढल्याने जिल्ह्यातील 350 जागांवर आता सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हापरिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील सर्व शाळा जून महिन्यात सुरू झाल्या. मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे.
त्यामुळे ‘पवित्र’ पोर्टलमार्फत नियमित शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त जागांवर शिक्षक भरण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार, आता नगर जिल्हा परिषदेकडील 350 रिक्त शिक्षकांच्या जागादेखील याच सेवानिवृत्त शिक्षकांमधून भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यासाठी रिक्त जागांचा तपशील, त्यासाठी अर्ज मागाविणे, त्यानंतर अटी व नियमांची पूर्तता करणार्‍या पात्र उमेदवारांपैकी नियुक्त्या देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे आता महिनाभरातच सर्वच शाळांत शिक्षक नियुक्त झालेले पाहायला मिळणार आहेत.

अटी आणि नियम

कमाल वयोमर्यादा 70 वर्षे
मानधन मासिक 20 हजार    रुपये
शिक्षणाधिकार्‍यांशी होणार    करारनामा
नियुक्त शिक्षकाचे बंधपत्र,    हमीपत्र
सीईओ, शिक्षणाधिकारी    देणार नियुक्ती आदेश
रिक्त जागांची गरज ओळखून    पदे भरणार
15 दिवसांच्या आत    नियुक्त्या देण्याची प्रक्रिया

सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रतिसाद मिळणार?

जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणुका दिल्या जाणार आहेत. सोयीच्या ठिकाणी असे शिक्षक मिळतीलही, पण अकोले, संगमनेरसारख्या दुर्गम भागातील शाळांत रिक्त असलेल्या जागांवर खरोखरच सेवानिवृत्त शिक्षक जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हेही वाचा

Back to top button