

लोणी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी एक रुपयात पीक विमा योजना शेतकर्यांना दिलासा देणारी ठरेल, राज्यातील शेतकर्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव असल्याचा असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. खरीप व रब्बी हंगामाकरीता एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्यार्या रथाचे पुजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्ह्यात योजनेची माहीती देण्यासाठी रथ रवाना करण्यात आले.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे, सतिष कानवडे, लोणी बु. सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक धावणे, जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषि आधिकारी विलास गायकवाड यांच्यासह कृषि विभागातील आधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकर्यांनी स्वत:हून आता पुढे आले पाहीजे. हवामानातील बदल कृषि क्षेत्रापुढे मोठे आव्हान असल्याने आपल्या पीक उत्पादनाची सुरक्षितता वाढविण्यासाठी विमा योजनेचे संरक्षण कवच महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकर्यांनी कृषि कार्यालयांमध्ये संपर्क साधून या योजनेची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कृषि आधिकार्यांनी गावपातळीवर जावून या योजनेचा प्रसार आणि प्रचार करुन, योजनेची माहिती शेतकर्यांना देण्याच्या सुचना केल्या. जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी या पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम तारीख असून, शेतकर्यांनी आपले अर्ज दाखल करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, उपविभागीय कृषि आधिकारी, तालुका कृषि आधिकारी कार्यालयातही संपर्क साधून योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी पीक विमा योजनेचा त्रास शेतकर्यांना सहन करावा लागला. शेतकर्यांची आर्थिक लूट आणि फसवणूक झाली. या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी सरकारने शेतकर्यांकरीता एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. त्याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून सुरु होत आहे. या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतकर्यांवर पडणार नाही. शासनच आता विम्याची रक्कम भरणार आहे.
– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील