नगर जिल्ह्यातील तलाठ्यांची 250 पदे भरणार | पुढारी

नगर जिल्ह्यातील तलाठ्यांची 250 पदे भरणार

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सरळसेवाभरतीव्दारे 4 हजार 625 तलाठ्यांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 250 जागांचा समावेश आहे. या नवीन भरतीमुळे पदवीधर युवकांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. मात्र, अर्ज दाखल करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील युवकांना 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. महसूल विभागात तलाठी हे महत्वपूर्ण पद आहे. क वर्ग असलेल्या या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी 26 जूनपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. पदवीधर असलेल्या युवकांना 17 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 48 पदे रिक्त आहेत. शासनाने नव्याने 202 पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे एकूण 250 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

सध्या पदवीधर बेरोजगार युवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अर्जांची संख्या हजारोच्या संख्येत असणार आहे. या पदासाठी अर्जाबरोबर खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार तर मागासवर्गीय युवकांसाठी 900 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एमपीएससी परीक्षांसाठी दोनशे तीनशे रुपये शुल्क असते. त्यामुळे शुल्क रक्कम कमी करावी, अशी मागणी जोर धरत आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 38 तर मागासवर्गीय युवकांसाठी 43 वर्षे वयोमर्यादा असणार्‍यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. एका जणाला एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे.

महसुली कामकाजाला वेग येणार
जिल्ह्यात सध्या 48 तलाठी पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. भरतीप्रक्रियेमुळे या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे महसुली कामकाजाला अधिक वेग येणार आहे. याशिवाय शासनाने नव्याने जिल्ह्यात 202 पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे एकूण 250 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

Back to top button