सर्वदूर पावसाने शेतकर्‍यांना दिलासा

सर्वदूर पावसाने शेतकर्‍यांना दिलासा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  आर्द्रा नक्षत्राने जाता जाता शेतकर्‍यांना किंचितसा दिलासा दिला. बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. सरासरी 16.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. कर्जत, श्रीगोंदा व जामखेड या तीन तालुक्यांत दमदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पेरणीचा वेग वाढणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आर्द्रा नक्षत्राने जोरदार आगमन केले. पाऊस सुरू झाला असे वाटत असतानाच आर्द्राने हलक्या स्वरूपात हजेरी लावली.

बुधवारी आर्द्रा नक्षत्राचा शेवटचा दिवस होता. दिवसभरात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दिवसभरात सरासरी 16.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सर्वच मंडलांत पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, 56 महसूल मंडलांत 8 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यात सर्वात कमी 3.5 मि.मी. पाऊस झाला. राहुरी तालुक्यात 4.8, शेवगाव तालुक्यात 8.2 मि.मी. पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांत मात्र सरासरी 10 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
गेल्या वर्षी या कालावधीत सरासरी 126.7 मि.मी. पाऊस झाला होता. यंदा फक्त 69.4 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 57 मि.मी. पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे खरीप पेरणीला फटका बसला आहे.

रुईछत्तीशी, मिरजगाव मंडलांमध्ये अतिवृष्टी
नगर तालुक्यातील रुईछत्तीशी महसूल मंडलात 96.8 तर कर्जत तालुक्यातील मिरजगाव मंडलात 89.5 मि.मी. पाऊस झाला आहे. याशिवाय श्रीगोंदा मंडलात 62.8, चिंभळा 55.3, कोळेगाव 47, माही 45, पळशी 44.5, बेलवंडी 42, कापूरवाडी 34.3, कोंभळी 33.5 चिचोंडी पाटील मंडलात 29.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 34 हजार 24 हेक्टर पेरणी
जिल्हाभरात खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेली असून, पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने अल्प प्रमाणात पेरणी झाली. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 34 हजार 24 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक 18 हजार 357 हेक्टर क्षेत्रावरील कापसाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news