संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 12 महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामाकरीता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 6 कोटी 68 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे सर्व रस्तांच्या कामाकरीता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनोतून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी गावागावातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना मंजूरी मिळून निधीची उपलब्धता व्हावी म्हणून पाठपुरवा केल्यानेे गुंजाळवाडी- राजापूर- निमगाव-भोजापूर-चिकणी या 11 कि मी रस्त्याकरीता 9 लाख 17 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
तसेच जिल्हा बॉर्डर- आशापीर बाबा- चिंचोली गुरव- नान्नज दुमाला- बिरेवाडी- सोनोशी मालदाड या गावांना जोडल्या जाणार्या रस्त्याच्या कामासाठी 14 लाख 45 हजार, पिंपळे मालदाड संगमनेर या मार्गासाठी 4 लाख 37 हजार, शेडगाव- मांलुजे- डिग्रस- रणखांबवाडी- दरेवाडी-कौठे मलकापूर- म्हैसगाव रस्त्याकरीता 4 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तळेगाव दिघे ते तालुका हद्दीपर्यतच्या मार्गाकरीता 2 लाख 34 हजार, कोल्हेवाडी ते जोर्वे रस्त्या करीता 2 लाख 98 हजार.
पिंपरणे ते कोळवाडे शिरापूर रस्त्याकरीता 4 लाख 96 हजार, राजापूर ते राज्यमार्ग क्र 50 चिखली रस्ता 3 लाख 57 हजार, नांदूर खंदरमाळ ते मोरवाडी बावपठार 3 लाख 7 हजार, राज्यमार्ग क्र. 60 घारगाव शेळकेवाडी- अकालापूर या गावातील रस्त्या करीता 3 लाख 31 हजार रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. सारोळे पठार ते धादवडवाडी रस्ता 2 लाख 94 हजार, रणखांबवाडी फाटा ते रणखांबवाडी व कुंभारवाडी- वरंवडी रस्त्याकरीता 1 लाख 11हजार असा एकूण 6 कोटी 68 लाख रू निधीला मान्यता मिळाल्याने रस्त्यांची काम गतीने पूर्ण होतील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
इतर रस्त्यांसाठीही लवकरच निधी
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणशत निधीला मान्यता मिळाली आहे. यामुळे सर्वच रस्त्ये होणार आहे. राहिलेल्या रस्त्यांचे प्रस्ताव आलेले असून त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करू असे महसूलमंत्री विखे पा. म्हणाले.