नगर : संगमनेर राष्ट्रवादीचा कल अजित पवारांकडे | पुढारी

नगर : संगमनेर राष्ट्रवादीचा कल अजित पवारांकडे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा  : उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या गटाच्या आज होणार्‍या मुंबईतील बैठकीसाठी संगमनेर तालुका, शहर, युवक व महिला राष्ट्रवादीचे पदाधिकारी जाणार आहेत, मात्र संगमनेर राष्ट्रवादीच्या बहुसंख्य पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे जाण्याचा कल असल्याचे आजच्या येथील बैठकीत ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संगमनेर तालुका, शहर, युवक व महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात की, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये जायचे, अशा द्विधा मनःस्थितीत सर्वच असल्याचे दिसले, मात्र आपण सर्वजण सत्तेबरोबरचं गेले पाहिजे. यासाठी सर्वांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा द्यावा, असा ठराव करावा अशा सूचना राष्ट्रवादीच्या बहुतांश पदाधिकार्‍यांनी बैठकीमध्ये केल्या.

दरम्यान, यावर मुंबईत होणार्‍या बैठकीनंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असे काही पदाधिकारी म्हणाले. यामुळे संगमनेर राष्ट्रवादीची भूमिका अजित पवार की, शरद पवार हे दोन दिवसानंतरचं निश्चितपणे समजणार आहे. उपमुख्य मंत्री अजित पवार तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या मुंबईमध्ये स्वतंत्र बैठका होणार आहेत. यात उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या बैठकीसाठी जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बहुतांश पदाधिकार्‍यांनी घेतला, मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आपले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बैठकीलाही आपण जावे, असेही काही पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

यानुसार संगमनेरातून राष्ट्रवादीचे आज (बुधवारी) मुंबईत होणार्‍या बैठकीसाठी 25 ते 30 पदाधिकारी जाणार आहेत. त्यामुळे नेमके किती पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार की, शरद पवार यांच्या बैठकीला जातात, हे मात्र गुलदस्त्यातचं असल्याचे दिसत आहे.

एकमुखी पाठिंबा अजित पवार यांनाच..!
संगमनेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आत्तापर्यंत सत्तेच्या माध्यमातून अनेक कामे उप मुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे यांनी केली. यामुळे संगमनेर राष्ट्रवादीने उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा ठराव करावा, अशी सूचना मांडत आपला एक मुखी पाठिंबा अजित पवार यांनाच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरूनाथ उंबरकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button