नगर : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ योजनेचा बोजवारा | पुढारी

नगर : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ योजनेचा बोजवारा

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : झाडे लावा, झाडे जगवा’ या योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला असून, रोप लागवडीकडे सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षलागवडीसाठी आलेल्या निधीचा गैरवापर होताना दिसत आहे. दरम्यान,मांडवी खुर्दमधील प्रकाराची वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करून तालुक्यातील अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाईची मागणी होत आहे. ‘पुढारी’मध्ये आलेल्या वृत्तानंतर तालुक्यातील सामाजिक वनीकरणाचे अधिकारी मांडव्यातील डोंगरावर पोहोचले. झाडे नसलेल्या खड्ड्यांची मोजणी करून आपली चूक झाकवण्यासाठी त्यात झाडे लावण्याचा पराक्रम वन विभागाचे अधिकारी करीत आहेत. खड्डा तोच पुन्हा त्यातच झाडे म्हणजे शासनाच्या पैशाची लूट अधिकारी भरदिवसा करीत आहेत. याला वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

मांडवे खुर्द येथे सामाजिक वनीकरण विभागाने दहा हेक्टर क्षेत्रावर अकरा हजार वृक्षलागवड गतवर्षी जुलै महिन्यात केली. लागवडीनंतर डिसेंबरमध्ये या झाडांना पाणी घातले. त्यानंतर त्या झाडांना आजपर्यंत पून्हा पाणी घातले नाही. त्यामुळे तेथील झाडे जळाली की गायब झाली, याबाबत ‘पुढारी’ने पर्दाफाश केला. त्यामुळे सामाजिक वनीकरण अधिकार्‍यांना जाग आली. त्यांनी मांडव्यातील डोंगर पालथा घालून झाडांची संख्या व गेलेली झाडे लावण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र, गेलेल्या झाडांचे. त्यासाठीचा खर्च या प्रश्नांचे उत्तर त्यांनी आधी देणे गरजेचे आहे.

सामाजिक वनीकरणच्या अधिकार्‍यांनी मांडवे खुर्द डोंगरावर अकरा हजार झाडे कागदावर लावले आहेत. प्रत्यक्षात तेथे किती झाडे शिल्लक आहेत, याबाबत वरिष्ठ कार्यालयातून चौकशी होऊन संबंधित झाडांची पाहणी होणे गरजेचे होते. तसे न होता मोकळ्या खड्ड्यांत पुन्हा वृक्षलागवड करून गतवर्षी केलेली वृक्षलागवड उत्तमरित्या जिवंत आहे, असे भासवण्याचा प्रकार सध्या केला जात आहे. वृक्षारोपणासाठी रोपे तयार करण्याचे काम सामाजिक वनीकरण विभाग करतो. यासाठी पाण्याची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता, यानुसार रोपवाटिका तयार केल्या जातात.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत तालुक्यातील वृक्षारोपणमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत लावलेली अनेक वृक्ष नष्ट झाले आहेत. सामाजिक वनीकरणच्या गलथान कारभारामुळे झाड़े जागीच जळून गेली आहेत. वृक्षाचे व्यवस्थापन पाहणार्‍या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या कडे का दुर्लक्ष केले, असा सवाल केला जात आहे.

वन विभागाचे दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मांडवे येथील काही झाडांना खालून कोंब फुटले आहेत. मात्र, वन विभागाने त्यांची काळजी न घेतल्याने झाडे वाळून गेली आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी शासनाने लाखो रुपयांचा खर्च टँकरद्वारे पाणी देण्यासाठी केला असताना ते पाणी झाडांपर्यंत पोहोचले नाही.

Back to top button