

श्रीकांत राऊत :
नगर : महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या भरोसा सेलचा गेल्या कित्येक दिवसांपासून उरफाटा कारभार सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरांना 'धडा' शिकविण्याचे सोडून 'भरोसा सेल' भलत्याच कामांमध्ये व्यस्त असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले असून, टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी असलेल्या दामिनी पथकालाच कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी एका मुलीवर तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तसेच, रायगडाच्या पायथ्याशी घडलेल्या अशाच घटनेत कोपरगावच्या दर्शना पवारचे स्वप्न अधुरेच राहिले. या पार्श्वभूमीवर नगरमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे 'दै. पुढारी'च्या पाहणीत उघड झाले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या दामिनी, निर्भया पथकाची स्थापना केली आहे. या पथकांकडून टवाळखोरांवर धडाकेबाज कारवाईची अपेक्षा असते. मात्र, नगर शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंकडून मुलींना छेडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. छेडछाड, विनयभंगाचे दरदिवशी गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, पोलिसांची दामिनी व निर्भया पथके कुठेच कारवाया करताना दिसत नाहीत. त्यामुळे शहरातील मुली, महिला 'निर्भय' कशा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याची जबाबदारी दामिनी पथकावर असते. परंतु, त्याचाही विसर पडलेला आहे. नगर शहरात अल्पवयीन मुली, विद्यार्थिनी तसेच महिलांची छेडछाड, विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक राकेश ओला भरोसा सेलच्या चुकीच्या कारभारावर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तक्रार न केलेलीच बरी
कौटुंबिक वादाची प्रकरणे मिटविण्यासाठी भरोसा सेल कार्यरत आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांचे योग्य काउन्सिलिंग करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकार्यांची असते. परंतु, तक्रार देण्यासाठी जाणार्या महिलांना भरोसा सेलमधील कर्मचारी अरेरावीची भाषा करत तक्रारदारालाच 'दम' देतात. त्यामुळे भरोसा सेलमध्ये तक्रार न केलेलीच बरी, अशी आपबीती तक्रारदार महिलांकडून ऐकावयास मिळते.
अहमदनगर महाविद्यालय
शहरातील अहमदनगर महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींना दामिनी पथकाबाबत विचारले असता, पथकाचे वाहन फारसे कधी दिसत नाही. तसेच, गेल्या महिन्यात पथक दिसले होते, असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
न्यू आर्ट्स महाविद्यालय
सिद्धीबाग परिसरातील न्यू आर्ट्स या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांशी 'पुढारी'ने संवाद साधल्यानंतर दामिनी पथकाचे वाहन गेट समोरून जाताना दिसते. परंतु, महाविद्यालयाच्या परिसरात कधी पथक येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एका कर्मचार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की पूर्वीप्रमाणे दामिनी पथक आता दिसत नाही. अनेकदा टारगट मुलांना आम्हालाच हटकावे लागते.
अधिकारी म्हणतात, 'मनुष्यबळ नाही'
शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी उबरहंडे-देशमुख यांनी मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले. 'भरोसा सेलकडे मनुष्यबळ कमी आहे; पण शाळा-कॉलेजांना भेटी नियमित सुरू असतात', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा :