नगर राष्ट्रवादी दुभंगली ! नगर शहराध्यक्ष शरद पवारांसोबत तर अकोले, पारनेर तालुकाध्यक्ष लंके, लहामटे यांच्यासोबत !  | पुढारी

नगर राष्ट्रवादी दुभंगली ! नगर शहराध्यक्ष शरद पवारांसोबत तर अकोले, पारनेर तालुकाध्यक्ष लंके, लहामटे यांच्यासोबत ! 

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्यासह नगर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैंकी तिघे अजित पवार यांच्यासोबत राजभवनातील शपथविधीला उपस्थित होते. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे परदेशात गेल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. सहापैंकी तीन आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली असून आधे इधर, आधे उधर अशी अवस्था झाली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ देणारा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील 12 पैकी सहा आमदार राष्ट्रवादीचे असल्याने नगरवर पवारांचेही विशेष लक्ष आहे. त्याच नगर जिल्ह्यातील संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे, नीलेश लंके या तीन आमदारांनी अजित पवार यांच्या विचारांशी सहमती दर्शवीत त्यांच्यासोबत शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र या तिघांच्या मतदारसंघातील तालुकाध्यक्षांची भूमिका जाणून घेतली असता ती वेगवेगळी असल्याचे समोर आले. पक्षाचे नगर शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी, आपण पक्षासोबत म्हणजेच शरद पवार यांच्या विचारांसोबत असल्याचे स्पष्ट केले, तर अकोले तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी आ. लहामटे यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

लंके यांच्या पारनेर तालुक्याचे अध्यक्ष बाबाजी तरटे यांनीही आमदार लंकेंसोबत असल्याचे सांगितले. नगर शहरात पक्ष शरद पवारांसोबत, तर महापालिकेतील नगरसेवक आमदार जगताप यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे परदेशात असल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा दिल्लीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे दोन आमदार सोबत आल्याने आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी झाल्याचे मानले जाते.

आमदार नीलेश लंके आता लोकसभा लढणार का?

आमदार नीलेश लंके यांच्याकडे नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे लंके नगर लोकसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय झाल्याचे चित्र अनेकांच्या नजरेत भरणारे आहे. म्हणूनच त्यांची राजभवनातील शपथविधीला उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा निवडणुकीसाठी ज्या विखेंविरोधात लंके यांनी शड्डू ठोकला होता, त्याच विखेंसोबत लंके आता सत्तापक्षाचे आमदार म्हणून समोर आले आहेत. भाजप-शिंदे-पवार सरकारमधील लंके हे मंत्री विखेंच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविणार की सत्तापक्षाचा धर्म पाळत थांबणार, याची उत्सुकता आता आहे. लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला, तर राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार कोण? आणि सत्तापक्षात विखे-लंके यांचे सूर जुळणार का? हाही औत्सुक्याचा विषय आहेे.

Back to top button