शरद पवार यांचे पुन्हा एक अर्धसत्य ! राष्ट्रवादीच्या मोठ्या खेळीमागे विकासाची पोकळी | पुढारी

शरद पवार यांचे पुन्हा एक अर्धसत्य ! राष्ट्रवादीच्या मोठ्या खेळीमागे विकासाची पोकळी

विष्णू वाघ :

राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप घडविणारा कालचा सुपर संडे सर्वांसाठी अचंबित करणारा ठरला. राजकारणातील भीष्माचार्य, चाणक्य, जाणता राजा अशा अनेक बिरूदावलीने सुपरिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना राजकीय वारे बघून दिशा बदलण्याची हातोटी असल्याचे बोलले जाते. मात्र काल विरोधी पक्षनेते अजित पवार 40 आमदारांसह भाजपा-शिवसेना सरकारमध्ये थेट सामील झाले. तरीही शरद पवारांच्या चेहर्‍यावरील हासु बघून अनेकांनी राजकारणात हतबल होतील ते पवार कसले? असा मिश्किल प्रश्न उपस्थित केला. दरम्यान पवारांनी सन 1980 मध्ये पक्ष फुटीनंतर दुसर्‍यांदा घडलेल्या या घटनेत नाविण्य नाही अशी टीपण्णी केली. पवारांनी 80 मधील पक्षफुटीत यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख खुबीने टाळला. तसा राष्ट्रवादी पक्ष फुटीत भ्रष्टाचार व विकासाची पोकळी दुर्लक्षित करून पुन्हा एकदा अर्धसत्य जनतेसमोर मांडले आहे.

राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा शत्रु नसतो असा मापदंड लोकमान्य करणार्‍या शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी काल अनपेक्षीतपणे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेवून तंतोतंत खरा ठरविला आहे. राज्यातील या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याचे वास्तव असले तरी ही पवारांची खेळी तर नाही ना? असा जाणकारांना पडलेला प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. भारतीय जनता पार्टीने ‘इडी’चा बडगा उगारून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेल्या अनेकांना मंत्रीपदाची शपथ दिली, ही गोष्ट खरी मानली तरी राष्ट्रवादीचे इतर 31 आमदार हे राज्यातील सत्ताबदल झाल्याने निर्माण झालेली विकासाची पोकळी भरुन काढण्यासाठी या मोठ्या खेळीत सहभागी झाल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आहेत. त्यापैकी आ. रोहित पवार व आ. प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्याबरोबर थांबले असल्याचे चित्र आहे तर आ. डॉ. किरण लहामटे व आ. संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत गेले असले तरी आ. आशुतोष काळे व आ. निलेश लंके यांची भूमिका अद्याप गुलदस्तात असल्याचे चित्र आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल अचानक आपल्या पदाचा राजीनामा देवून ‘भाजपा-सेना’ पक्षामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शरद पवार यांचे कट्टर समर्थक मंत्रीपदाची शपथ घेतांना दिसले. त्यामुळे या घटनाक्रमामागे खुद्द शरद पवार तर नाही ना? असा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला होता, मात्र शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घटना माझ्यासाठी नवी नाही असा उल्लेख करून आपण उद्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृती स्थळावर दर्शन घेवून पक्ष बांधणीला पुन्हा सुरूवात करणार असल्याचे सुतोवाच केले. मात्र यावेळी सन 1980 च्या राजकीय घडामोडीचा दाखला देतांना यशवंतराव चव्हाणांचा नामोल्लेख टाळल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहे.

सन 1980 मध्ये पक्षामध्ये उभी फूट पडून 52 आमदार दुसर्‍या पक्षात गेले. माझ्याकडे केवळ माझ्यासह 6 आमदार उरले. तेव्हा मी पुन्हा पक्षबांधणी केली. पुढच्या निवडणुकीत आमचे 67 आमदार निवडून आले असा घटनाक्रम पवारांनी सांगितला. मात्र 1980 मध्ये सर्व आमदार यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये गेल्याचे पवारांनी सांगितले नाही. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमागे नेमके कोण? याबाबत उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे.

प्रत्येक घटनेत पवारांचा खुबीने स्वार्थ
आजपर्यंत घडलेल्या अनेक घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका बाजुने अथवा विरोधात असो, मात्र त्या घटनेचा नेमका स्वार्थ कसा साधायचा यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमागे भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सहकार्‍यांना अभय. आघाडी सरकारच्या विकासकामांना मिळालेली स्थगिती उठवून विकासाची पोकळी भरून काढण्याचा पवारांचा स्वार्थ असल्याचे बोलले जात आहे.

विकासाच्या वाटेवरून ‘पुलोद’चा प्रयोग
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये आमदारांचे विकासाचे कामे होत नव्हती. पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड असंतोष पसरला. या पार्श्वभुमीवर शरद पवार, यशवंतराव चव्हाण व गोविंदराव आदिक यांच्या पुढाकारातून सरकार बदलाचा निर्णय झाला. जनता पक्ष, मस्का काँग्रेस, रेड्डी काँग्रेस असा पुरोगामी लोकसेवा दल (पुलोद) स्थापन करून शरद पवार मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून राज्यात विकासाच्या मुद्यावरून सत्ताबदलाचा प्रयोग होत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपवाद कसा?

Back to top button