नगर-मनमाड रस्त्याचे अर्धवट काम ठरतेय मृत्यूचा सापळा | पुढारी

नगर-मनमाड रस्त्याचे अर्धवट काम ठरतेय मृत्यूचा सापळा

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, असे म्हणण्याची वेळ वाहन चालकांवर यावी अशी काहीशी परिस्थिती नगर- मनमाड राज्य मार्गावरील अर्धवट झालेल्या कामामुळे झाली असल्याचे चित्र सध्या नगर-मनमाड राज्य मार्गावर दिसत आहे. गेले चार-पाच वर्ष या राज्य मार्गावर नगर ते कोपरगाव पर्यंत अनेक ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडल्याने या राज्यमार्गाची अक्षरशः मोठ्या प्रमाणात चाळण झाली होती. अशा ही अवस्थेत अनेक यातना सहन करीत या राज्य मार्गावरून दुचाकीस्वार, एसटी बसेस व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती.

जीव मुठीत धरूनच वाहन चालक या राज्य मार्गावरून ये-जा करीत होते. या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघात या कालावधीत मोठ्या पडलेल्या खड्ड्यामुळे झाले. यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. काही कुटूंबांनी कर्ता पुरूष गमावला. तर अनेक प्रवाशी पाठीच्या मणके व मानेच्या आजाराने त्रस्त झाले. दैनिक पुढारीने या याबाबत चाळण झालेल्य महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल छायाचित्रासहित अनेक बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि या राज्यमार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला गती देत सुरुवात झाली.

परंतु वाढत्या टक्केवारीमुळे व दुरुस्तीच्या कामाचे बजेट वाढल्यामुळे पहिल्या ठेकेदाराने या राज्य मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून काढता पाय घेतला. बराच कालावधी उलटल्यानंतर दुसर्‍या ठेकेदाराने हे काम घेतले. या ठेकेदाराने देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पॅचिंगचे काम केल्यामुळे राज्यमार्गाची परिस्थिती जैसे थे राहिली.

कोल्हार ते तिसगाववाडी फाट्यापर्यंत अद्यापही या राज्य मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत तसेच पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून कोल्हार ते तिसगाव वाडी फाट्यापर्यंत या राज्य मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. या अर्धवट राज्यमार्गावर पडलेले सिमेंटचे पाईप ज्या ठिकाणाहून ड्रायव्हर्शन होते, त्या ठिकाणी ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक न लावल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकाचा गोंधळ उडतो. या ठिकाणी अलीकडच्या काळात अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा राज्यमार्ग आजही वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

कोल्हार ते तिसगाव फाट्यापर्यंत रखडलेल्या रस्त्याच्या कामाला कधी मुहूर्त मिळणार आहे, असा सवाल वाहन चालक व प्रवास करणारे प्रवासी करीत आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक मार्ग समृद्ध झालेले असताना देखील साईबाबांच्या शिर्डीहून श्री क्षेत्र शनिशिंगणापूरकडे जाणार्‍या या अर्धवट राज्य मार्गावर साई भक्तांना अनेक यातना सहन करी आपला प्रवासायात्रा मार्गक्रमण करावी लागत असल्याने अनेक यातना सहन करावी लागत आहे.

शासनाच्या अशम्य दुर्लक्षपणामुळे अजून किती दिवस साई भक्त व शनी भक्तांना या अर्धवट व मोठ्या प्रमाणावर मृत्यूचा सापळा बनलेल्या राज्य मार्गावरून मार्गक्रमण करावे लागणार आहे? हा प्रश्न वाहन चालका बरोबरच नागरिक, प्रवासी यांना पडलेला आहे. लवकरात लवकर या अर्धवट स्थितीत राहिलेल्या राज्य मार्गाचे काम सुरू व्हावे, पूर्ण करावे अशी अपेक्षा वाहन चालक, साईभक्त, परीसरातील नागरीक करीत आहे.

हेही वाचा

नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आयोजित ऑलिम्पिक सप्ताहास प्रारंभ

आश्वी : डोळ्यात मिरची पूड टाकून सोनाराला लुटले

नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आयोजित ऑलिम्पिक सप्ताहास प्रारंभ

Back to top button