

करंजी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : परवाना नसताना गोदामामध्ये खते व बियाणांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याने कृषी विभागाच्या अधिकार्यांनी खांडगाव (लोहसर) येथील कृषी केंद्रावर मंगळवारी (दि.27) छापा टाकून गोदाम सील केले. तालुका कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, शिराळ परिसरातील बर्याच गावात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे. या भागातील काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बियाणे व खतांचा विनापरवाना साठा केला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्यावरून मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकार्यांनी तालुक्यातील खांडगाव (लोहसर) येथील नाथकृपा व बळीराजा या दोन कृषी सेवा केंद्राची झाडाझडती घेतली. यामध्ये कृषी केंद्र चालकाकडे परवाना नसतानाही गोदामात खते व बियाणांचा साठा केल्याचे आढळून आले. या कृषी सेवा केंद्रांचे गोदाम सील करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यावर्षी शेतकरी पाऊस पडेल की नाही, अशा संभ्रमास्थेत होते. महिनाभर उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे बियाणे व खतांसाठी शेतकर्यांची कृषी केंद्राकडे ये-जा सुरू झाली. याचा फायदा घेऊन या भागातील काही कृषी सेवा केंद्र चालकांनी अनधिकृतपणे आडमार्गावर गोदाम उभे करून खते व बियाणांचा अनधिकृत साठा करून ठेवला होता. याची माहिती कृषी विभागाला समजली. त्यानंतर त्यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई सुरू केली असून, त्यामध्ये काही कृषी केंद्र चालकांकडे मुदत संपलेली औषधे आढळून आली आहेत.
तर, काही कृषी केंद्र चालकांना काही कंपन्यांचे खत विक्रीचा परवाना नसताना, त्यांच्याकडून राजरोसपणे खत विक्री सुरू असल्याचेही पथकाने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. खरीप व रब्बी हंगामात कृषी केंद्रचालक बियाणे व खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत आहेत. बोगस बियाणे विकणार्या, तसेच, खते व बियाणांचा विना परवाना साठा करून शेतकर्यांची लूट करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील शेतकर्यांकडून केली जात आहे.
कृषी केंद्रावर पथकांचा वॉच
खांडगाव येथील दोन कृषी सेवा केंद्रांना परवाना नसताना खते व बियाणांचा साठा केल्याचे आढळून आल्याने दोन्ही दुकानांचे गोदाम सील केले आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व कृषी केंद्रावर कृषी विभागाचा वॉच राहणार आहे, असे पाथर्डीचे तालुका कृषि अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले.