दर्शना पवारच्या मृत्यूप्रकरणी संशयितास फाशीची शिक्षा द्या; आई-वडिलांसह सकल मराठा समाजाची मागणी

दर्शना पवारच्या मृत्यूप्रकरणी संशयितास फाशीची शिक्षा द्या; आई-वडिलांसह सकल मराठा समाजाची मागणी

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आमची कन्या दर्शना पवार हिच्या खुनातील संशयीत आरोपी राहुल हंडोरे यास फाशीची शिक्षा द्यावी, याप्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी दर्शनाचे वडील दत्तात्रय पवार व आई सुनंदा पवार यांच्यासह सकल मराठा समाजाच्या शहर व तालुक्याच्या वतीने काढलेल्या मोर्चाप्रसंगी केली.
दरम्यान, याबाबत तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळून काढण्यात आला. सकल मराठा समाजासह विविध पक्षांचे, समाजाचे कार्यकर्ते व महिला मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली. 'दर्शना पवार हिला न्याय मिळालाचं पाहिजे,' आरोपीला फाशीची शिक्षा द्या, खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात येवून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. मोर्चाप्रसंगी अनेक महिलांनी संतप्त भावना व्यक्त करीत मृत दर्शना पवार हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.

तातडीने तपासाची चक्रे फिरली..!

मृत दर्शना पवार हिचे वडील दत्तात्रय व आई सुनंदा, भाऊ व त्यांच्या नातेवाईकांसह कोपरगावकर या दुर्घटनेतून अद्याप सावरले नाहीत. माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेवून आरोपीला त्वरीत अटक करावी, असे सांगत दर्शनाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केल्याने तातडीने तपासाची चक्रे फिरली गेली.

संशयित आरोपी राहुल हंडोरेचे कुटुंबीय बेपत्ता..!

संशयित आरोपी राहुल हंडोरे सिन्नर तालुक्यातील शहापंचाळे येथे राहात होता. तेथून त्याचे कुटूंब घटनेनंतर घर सोडून निघून गेल्याचे वृत्त आहे. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news