पारनेर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड; वन अधिकार्‍यांचे दुर्लक्ष | पुढारी

पारनेर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड; वन अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील गांजीभोयरे, चिंचोली, सिद्धेश्वरवाडी, बुगेवाडी, पारनेर, म्हसणे, पुणेवाडी, पिंपरी जलसेन, डिकसळ आदी गावांमध्ये भरमसाठ वृक्षतोड होत आहे. तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी येथे लाकूडतोड्यांची सर्वात जास्त संख्या आहे. दररोज जवळपास शंभरहून अधिक झाडांची कत्तल हे लाकूडतोडे करत आहेत. शासना कडून शतकोटी वृक्ष लागवड करण्यात आली. त्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. झाडे लावा, झाडे जगवा, हा संदेश गावोगावी पोहोचविला आहे. शत कोटी वृक्ष लागवड योजनेमध्ये सर्वात जास्त वृक्ष लागवड केली आहे.

पण, दुसर्‍या बाजूला अवाजवी वृक्षतोडही सुरू आहे. शेतकरी झाडांची विक्री करीत आहेत. कवडीमोल किमतीने झाडे घेऊन व्यापारी जास्त दराने विक्री करतात. अवैध वृक्षतोड ही पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. खासगी शेतातील बांधावरील वृक्षतोड करण्यात येत असल्याने भकास होत चालले आहे. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्वमालकीच्या जागेवरील वृक्षतोड करण्यासाठी परवानगी लागते. त्यासाठी अर्ज केल्यानंतर वनपाल, वनक्षेत्रपाल घटनास्थळी जाऊन वृक्षांचे मूल्यमापन करतात. त्यानुसार परवानगी दिली जाते. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. सरकारने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन अंमलबजावणीही केली. संबंधित विभागाकडून गावोगावी समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत. तालुक्यात वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड करणार्‍या दलाल मंडळींची चांगली चांदी होत आहे.

हेही वाचा

बनावट औषध निर्मात्या कंपन्यांवर केंद्राचा कारवाईचा बडगा, सहा महिन्यात 134 कंपन्यांची पाहणी

कर्जत बाजार समितीची पहिलीच बैठक रद्द

नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

Back to top button