

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा सर्वांत मोठा असल्याने जिल्हा विभाजन व्हावे यासाठी उत्तरेतील व दक्षिणेतील नागरिकांचीही मागणी आहे. जिल्ह्याचे विभाजनाचा प्रश्न महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या कार्यकाळातच मार्गी लावतील, असा विश्वास आमदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिल्हा विभाजनाबाबत उत्तरेत आंदोलन सुरू असून त्याबाबत आ. शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, मी मंत्री असताना जिल्हा विभाजनाबाबत माझी भूमिका आग्रही होती. मी प्रयत्नदेखील केले. परंतु युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात हा विषय आला. तरीदेखील त्याबाबत मी सकारात्मक होतो. त्या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. त्यांनीही विभाजनाला पाठिंबा दिला होता; परंतु आता ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असून विभाजनाचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच मार्गी लागेल. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केला असता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हिरवा कंदील देत अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा केली. आता जिल्ह्याच्या विभाजनाबाबत उत्तरेत आंदोलन होत आहेत. जिल्हा विभाजनाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरदेखील चर्चा करणार आहे. माझे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आहे. पण विभाजनाबाबत विखे पाटील हे निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
अहिल्यादेवी जयंतीनिमित्त 31 मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चौंडी येथे आले असता अहमदनगर चे नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी मी केली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेत अहिल्यानगर करण्याची घोषणा केली. तसेच नांदेड येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा आले असता त्यांनीही अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास हिरवा कंदील दिला. लवकरच हे नामांतर होणार असल्याचे सूतोवाच आ. शिंदे यांनी केले.
हेही वाचा