नेवासा फाटा : सारं गेलं रे भाऊ, काय सांगू तुम्हाला ? रस्तालुटीमुळे हैराण वाहनचालकाची कैफियत | पुढारी

नेवासा फाटा : सारं गेलं रे भाऊ, काय सांगू तुम्हाला ? रस्तालुटीमुळे हैराण वाहनचालकाची कैफियत

संदीप वाखुरे

नेवासा फाटा(अहमदनगर) : ‘भाऊ, मी चार दिवस बाहेर राहून तीन हजार रुपये कमावले. रात्रंदिवस गाडी चालवली; मात्र चोरांनी मला अडवून पाच मिनिटांत पैसे घेऊन पळून गेले. घरी जाऊ कसा? काय करू?’ अशी कैफियत मांडत त्या वाहनचालकाने हंबरडा फोडला.
मंगळवारी मध्यरात्री मोहन एकनाथ पवार (वय 52, उंदरी, ता. खामगाव, जि. बुलडाणा) हे ट्रकचालक पहाटे नेवासा फाटा येथे थांबले. चहा पिण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. हॉटेल मालकाला उधार चहा मागितला आणि उधार का घेतो, याचे कारण सांगू लागल्यावर तो मोठ्याने रडू लागला.. पहाटेची वेळ. सर्व तरुण वर्ग सकाळच्या व्यायामासाठी निघाला होता. पण ते दृश्य बघून सर्व जण हॉटेलकडे आले.

पवार यांनी चोरीची घटना सांगायला सुरुवात केली… नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे चहा घेण्यासाठी थांबायचे होते; पण नेवासा फाटा मोठे गाव आहे, तिथे थांबू असे वाटल्याने पुढे निघालो. माळी चिंचोरा फाट्याच्या पुढे दोन जणांनी हात केला. टायर पंक्चर झाल्याचा इशारा केला. गाडी थांबवली आणि ‘काही मदत करू का’ असे विचारत दोघे जवळ आले आणि एकाने चाकू व एकाने मिरची पूड तोंडावर टाकून मारहाण केली.

खिशातील तीन हजार दोनशे रुपये घेऊन पळून गेले.. घरी आई आजारी. मुलांच्या शाळा सुरू झाल्याने फी भरायचीय, ड्रेस घ्यायचाय. म्हणून सलग चार दिवस गाडी चालवली होती. पण पाच मिनिटांत सर्व काही गेलं रे भाऊ… असे सांगत पवार यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. माझ्यासारखे अनेक चालक जीव टांगणीला ठेवून गाडी चालवतात, असेही ते म्हणाले.

पवार यांच्यासारखे अनेक चालकांना चोरांचा मार खाऊन पैसे द्यावे लागतात. इतकी दहशत पोलिसांची नाही तर चोरांची झाली आहे. पांढरीपूल ते प्रवरासंगम या दरम्यानच्या महामार्गावर रस्तालुटीच्या अनुभवामुळे रात्रीच्यावेळी लघुशंका करणेही अवघड बनल्याचे काही गमतीदार अनुभव येथे उपस्थित प्रवाशांनी सांगितले.

माणुसकीचे दर्शन

ट्रकचालकाने काळजाला भिडणारा अनुभव सांगितल्यानंतर हॉटेलजवळ जमलेल्या काही तरुणांनी, बाहेरच्या प्रवाशांनी यथाशक्ती दहा रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत योगदान देऊन दोन हजार तीनशे रुपये गोळा केले. पण घरी जाईपर्यंत पुन्हा कोणी अडविले तर, असा प्रश्न उपस्थित केला. आणि हे पैसे गावच्या सरपंचाला ऑनलाईन पाठविण्याची विनंती पवार यांनी केली. साश्रूनयनांनी सर्वांचे आभार मानून ते ट्रक घेऊन मार्गस्थ झाले.

Back to top button