मी चांगलं काम करतोय का? आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट मतदारांना विचारला प्रश्न | पुढारी

मी चांगलं काम करतोय का? आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट मतदारांना विचारला प्रश्न

नगर : पुढारी वृत्तसेवा :  ‘सांगा, मी चांगले काम करतोय ना,’ असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट मतदारांना विचारला आहे. आपल्या शंभर दिवसांच्या कामाचे मूल्यमापन जनतेतून करण्यासाठी तांबे यांनी एक सर्वेक्षण केले. विशेष म्हणजे त्यात सहभागी साडेअकरा हजार जणांपैकी 87 टक्के मतदारांनी त्यांचे कौतुक केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या आमदार सत्यजीत तांबे यांना आमदार होऊन 100 दिवस झाल्यानंतर आपल्या कामाचे मूल्यमापन करणारे मतदारांचे सर्वेक्षण केले आहे.

आपण 100 दिवसांत केलेल्या कामाचा लेखाजोगा मतदारांसमोर मांडला. अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसह इतरही काही ठिकाणच्या तब्बल 11 हजार 620 लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. त्यातील 87.15 टक्के मतदारांनी तांबे यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. 6.25 टक्के लोकांनी काम बरं असल्याचे, तर उर्वरित 6.6 टक्के लोकांनी कामात सुधारणा व्हावी, असे मत नोंदवले. तांबे यांनी समाजमाध्यमांवरून 21 मे रोजी एका वेबसाईटच्या लोकार्पणाची घोषणा केली. तसेच लोकांनी 25 मेपासून 30 मेपर्यंत सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या आमदारकीच्या पहिल्या 100 दिवसांबाबत लोकांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकांनी केलेल्या सूचनांचा आता गंभीरपणे विचार करून त्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आमदार तांबे म्हणाले.

देशातील पहिलेच सर्वेक्षण
एखाद्या राजकीय नेत्याने निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांतच मतदारांना आपल्या कार्यपद्धतीबद्दल समाधान वाटत आहे अथवा नाही, याचे सर्वेक्षण केल्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे.

मतदार म्हणतात…
54.87 टक्के : युवकांच्या प्रश्नांकडे
लक्ष द्यावे
15.08 टक्के : महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे
14.81 टक्के : नगरच्या समस्यांवर तोडगा काढा
15.25 टक्के : बेरोजगारी, जुनी पेन्शन, कंत्राटी शिक्षकांच्या विविध मागण्या.

आमदाराने मूल्यमापन करून घेण्याची ही पद्धत चांगली आहे. राजकारणी मंडळी कायमच लोकांना गृहीत धरत आले आहेत. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
                                                                     -शैलेंद्र खडके, जळगाव

Back to top button