नगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवनच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो गावांची तृष्णा भागविली जाणार आहे. काही गावांत तर स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळ कनेक्शन मिळाल्याने गावकर्यांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद योजनेचे यश दर्शविणारा आहे. त्यामुळेच जलजीवन योजना ही खर्याअर्थाने ग्रामीण भागातील जीवनमान उंचाविणारी ठरत आहे. नेवासा तालुक्यातील राजेगावही याला अपवाद नाही. राजेगावची लोकसंख्या 1100 च्या आसपास आहे. तर कुटूंब 250 आहेत. या ठिकाणीही पाण्याची तीव्र समस्या होतीच. पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या चांदा आणि पाच गावांच्या योजनेत राजेगावचा समावेश होता.
मात्र ही योजना राजेगावकरांसाठी भ्रमनिराशा करणारी ठरली. योजना झाली तरी पाणी मात्र गावात काही आले नाही. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना विशेषतः महिला भगिनींना जवळच्या एका 'आडा'वरून दाव्याने तसेच हातपंपाने पाणी आणावे लागत होते. दिवस उजाडला की महिलांच्या डोक्यावर हंडा आलाच म्हणून समजा. अशी पाण्यासाठीची वणवण राजेगावकरांनी अनुभवली आहे. चार दोन वर्षांपूर्वी तर गावाला टँकरचा आधार घ्यावा लागल्याचे सांगितले जाते. यावरून या गावाची पाणी टंचाईची झळ लक्षात येते. मात्र आता जलजीवन योजनेमुळे गावात घरोघरी पाणी मिळणार असल्याने खर्या अर्थाने या गावचे ग्रामस्थ 'राजे' बनल्याचेही सुखःद चित्र आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांनी उपअभियंता आनंद रुपनर व त्यांच्या टीमच्या मदतीने राजेगावची योजना अगदी अल्पावधीत पूर्ण केलेली आहे. योजनेतून विहिर घेण्यात आली असून, सुदैवाने विहिरीला चांगले पाणी लागलेले आहे. त्यामुळे या गावची पाणी टंचाई कायमची संपणार आहे. हेच पाणी 60 हजार लिटरच्या पाणी टाकीत सोडून तेथून 210 कनेक्शनच्या माध्यमातून 1100 लोकांपर्यंत पोहचविले जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक विचार करून अंतर्गत पाईपलाईनचे कामही पूर्ण झालेले आहे.
नुकतीच योजनेची चाचणी घेतली असून, दारादारात नळाव्दारे आलेले पाणी ओसांडून वाहताना दिसले आहे. लवकरच नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी उवर्रीत काम पूर्ण करण्याच्या सूचना गडधे यांनी प्रशासन व ठेकेेदारास केलेल्या आहेत. नेवासाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वच योजना ह्या मार्च 2024 पूर्वी पुर्णत्वास नेण्यासाठी गडधे हे पाठपुरावा करत आहेत. वेळोवेळी गावचे सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्याशी चर्चा करत आहेत. तांत्रिक अडचणी तसेच स्थानिक अडचणी सोडविण्यासाठीही ते प्रयत्नशील दिसत आहे. याकामी सीईओंचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.
यापुर्वी आम्हाला जीवन प्राधिकरणची योजना होती. मात्र ती नादुरुस्त असल्याने आमच्या गावाला पाण्याची समस्या जाणवत होती. नळाव्दारे पाणी पुरवठा बंद होता. मात्र आता जलजीवनमुळे पाणी पुरवठा सुरू होईल. नुकतीच चाचणी झाली असून, ती यशस्वी ठरली आहे.
-अंबादास आव्हाड, सरपंच राजेगाव
हे ही वाचा :