नगर : संदीप बोदगेंच्या बैलजोडीची निवड ; शेख महंमद महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान | पुढारी

नगर : संदीप बोदगेंच्या बैलजोडीची निवड ; शेख महंमद महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान

श्रीगोंदा  : पुढारी वृत्तसेवा :  संत श्री शेख महंमद महाराजांच्या पालखी रथासाठी कृषी अधिकारी संदीप बोदगे यांची बैलजोडी मानकरी ठरली आहे. संत श्री शेख महंमद महाराज यांचा पालखी 19 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळ्याचे हे पहिले वर्ष असून, त्यासाठी पालखी रथ ओढण्याचा मान बोदगे यांच्या बैलजोडीला मिळाला आहे. खिलार जातीची ही सर्जा-राजाची बैलजोडी हा पालखी रथ घेऊन पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले संत श्री शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन संत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांनी शेख महंमद महाराज यांना श्रीगोंदा येथे आणून त्यांची व्यवस्था केली होती. शेख महंमद महाराज यांची व संत तुकाराम महाराज यांची पहिली भेट पंढरपूर येथे झाली होती. हेच औचित्य साधून या दोन पालखी सोहळ्यांची भेट पिराची कुरोली येथे चालू वर्षी होणार आहे. अनेक वर्षांपासून संत श्री शेख महंमद महाराज यांचा यात्रोत्सव श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवामध्ये हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पालखी सोहळा समितीने यावर्षी आषाढी पायी वारीसाठी जय्यत तयारी केली आहे.

बैलजोडीची निवड नेमकी कशी केली जाते?
संत श्री शेख महंमद महाराज यांचा पालखी रथ ओढण्यासाठी श्रीगोंद्यातील सहा बैलजोड्यांची पाहणी करण्यात आली. यापैकी संदीप बोदगे यांच्या जातीवंत खिलार बैलजोडीची निवड सोहळा समितीने केली. बोदगे यांच्या कुटुंबामध्ये वारीची अनेक वर्षांची परंपरा आहे. श्री संत शेख महंमद महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित हरिनाम सप्ताहामध्ये सलग पाच वर्षे ज्ञानेश्वरी पारायण संदीप बोदगे यांनी केले होते. पालखी सोहळ्यासाठी त्यांच्या बैलांची निवड करण्याची विनंती सोहळा समितीला केली होती.

बोदगे हे अनेक वर्षांपासून देशातील देशी गोवंशाचे जतन, संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी प्रयत्न केले व लढा यशस्वी केला. ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यती, तसेच पालखी रथ सोहळा, तसेच बगाड सोहळा यामुळे देशी गोवंशाच्या बैलांचे चांगल्या पद्धतीने जतन संवर्धन केले जाते. महिन्यापूर्वीच बोदगे यांनी ही बैलजोडी पुण्यातील प्रगतशील शेतकरी सागर टिळेकर यांच्याकडून घेतली.

त्यासाठी त्यांना लोहगावचे उद्योजक व यापूर्वीचे श्री संत तुकाराम महाराज पालखी रथाचे मानकरी भानुदास खांदवे यांचे सहकार्य लाभले. या पालखीच्या बैलांची विशेष काळजी घेतली जाते. पालखी पूर्वी बैलांचा सराव घेतला जातो. तसेच, त्यांच्या खाण्यापिण्याच्या संदर्भामध्ये विशेष आहाराचे प्रयोजन केले जाते. या बैल जोडीसाठी बोदगे यांनी समृद्धी फीडस् या कंपनीचा खुराक आवर्जून वापरला आहे. या खुराकामुळे पालखीच्या बैलांमध्ये एक विशेष ऊर्जा प्राप्त होते आणि हे बैल सदैव ताजेतवाने दिसतात. तसेच पालखी ओढण्यामुळे कोणताही ताणतणाव निर्माण होत नाही.

बोदगे कुटुंबाची 52 वर्षांची परंपरा
आमच्या कुटुंबात बैलगाडा शर्यतीसाठी बैलांचे संगोपन करण्याची जवळपास 52 वर्षांची परंपरा आहे. तसेच आळंदी व पंढरपूर वारीचीही परंपरा आहे. बैलगाडा शर्यत, आषाढी वारीचा पालखी सोहळा, तसेच बावधनचा बगाड सोहळा, यामुळे देशातील देशी गोवंशाचे जतन संवर्धन होते. संगोपनाची प्रेरणा वाढीस लागते. संत शेख महंमद महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड झाल्याबद्दल संदीप बोदगे यांनी पालखी सोहळा समितीचे आभार मानले.

Back to top button