सुविधांचा मास्टर प्लॅन तत्काळ तयार करा : मंत्री विखे पाटील

नगर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्यासह परजिल्ह्यातील दिंड्या आपल्या जिल्ह्यातून पंढरीला जातात. या दिंड्यातील वारकर्यांना पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या. जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणार्या सुविधांचा मास्टर प्लॅन तत्काळ तयार करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, मानाच्या पालख्यांचे प्रमुख अशोक सावंत, रघुनाथ गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी पालखी व्यवस्थापनातील प्रमुखांनी पाणी, रस्त्यावरील खंडडे, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य आदीबाबत विविध अडचणी मांडल्या
पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून 260 दिंड्या तर इतर जिल्ह्यातून 27 दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या दिंड्यामधील वारकर्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकर्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात यावी. प्रसंगी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व्यवस्था तसेच शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करा. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्यांची समिती स्थापन करून वारकर्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.