नगर : दगडफेक प्रकरणी 17 जणांना जामीन

संगमनेर शहर / श्रीरामपूर (नगर ): पुढारी वृत्तसेवा : संगमनेरातील भगवा मोर्चा आटोपून घराकडे जाणार्या जमावातील काहींनी समनापूरातील दुसर्या समुदायाच्या घरांवर दगडफेक करीत तिघांना मारहाण केली होत. पोलिसांनी संगमनेर व राहाता तालुक्यातील 17 जणांना अटक केली होती. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज (शुक्रवारी) न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वांची जामीनवर सुटका करण्याचे आदेश दिले. दरम्यान, जामीन अर्ज मंजूर करताना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांनी सर्व आरोपींना या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर मंगळवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली.
भगवा मोर्चा आटोपून घराकडे निघालेल्या जमावातील काहींनी समनापूरातील दुसर्या समाजाच्या काही घरांवर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत हुसेन फकिरमोहंमद शेख (वय 75) व इस्माईल फकिरमोहंमद शेख (वय 60) या दोघांना दुखापत झाली.
20 ते 25 जणांवर दंगलीसह प्राणघातक शस्त्रांचा वापर करुन हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फूटेज व उपलब्ध झालेले अन्य व्हिडिओ चित्रीकरण यातून सत्यम भाऊसाहेब थोरात (वय 23 वर्षे), सुनील बाबासाहेब थोरात (वय 23), ललित अनिल थोरात (वय 24), प्रमोद संजय थोरात (वय 21), दत्तात्रय संपत थोरात (वय 25), आबासाहेब शिवराम थोरात (वय 30, सर्व रा. वडगाव पान, ता. संगमनेर), अविराज आनंदा जोंधळे (वय 21), विकास अण्णासाहेब जोंधळे (वय 50), भाऊसाहेब यादव जोंधळे (वय 60 (तिघेही रा. कोकणगाव), कुणाल ईश्वर काळे (वय 19), करण ज्ञानेश्वर काळे (वय 19, दोघे (रा. माळेगाव हवेली), वैभव रंगनाथ बिडवे (वय 29, रा.मनोली), शुभम बाळासाहेब कडू (वय 23), उज्ज्वल सोपान घोलप (वय 20), ऋषीकेश शरद घोलप (वय 24), तनोज शरद कडू (वय 24) व महेश विजय कडू (वय 33, पाचही रा. पाथरे, ता. राहाता) या 17 जणांना कोम्बिंग ऑपरेशन राबवून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती. बुधवारी (दि. 7) रोजी सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपींच्यावतीने विधीज्ज्ञ अतुल आंधळे यांनी उत्साहाच्या भरात घडलेला प्रकार, सर्व आरोपींची स्वच्छ पार्श्वभूमी व त्यांचे भविष्य या मुद्यांवर युक्तिवाद करीत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यासह जामीनवर सुटका करण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी व बचाव पक्ष दोघांचा युक्तिवाद ऐकून अटकेतील 17 जणांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. सुटकेपूर्वी नातेवाईकांचे संपर्क क्रमांक व पत्ता घेण्यात आला.
दरम्यान, या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात आरोपींच्या नातेवाईकांसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसले. जामीन नंतर नातेवाईकांना हायसे वाटले.