नगर : ‘समृध्दी’वरील अपघातांमध्ये घट : विवेक भिमनवर | पुढारी

नगर : ‘समृध्दी’वरील अपघातांमध्ये घट : विवेक भिमनवर

कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  परिवहन विभागाने रस्ते सुरक्षेच्या राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील महामार्गांवर अपघाती मृत्यूंचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच महिन्यात 750 ने कमी झाले, असे सांगत समृध्दी महामार्गावर 10 एप्रिलपासून आत्तापर्यंत 15 हजार वाहनांच्या टायरची तपासणी करण्यात आली. 750 वाहनांना खराब टायर अभावी समृध्दीवर प्रवेश नाकारण्यात आला, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवर यांनी दिली.

महाराष्ट्र शासन परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू केला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर परिवहन विभागाने शिर्डी- कोपरगाव इंटरजेंचवरील टोलनाक्यावर टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन आयुक्त भिमनवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रस्ता सुरक्षा कक्षाचे उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, औरंगाबादचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक परिवहन अधिकारी मनिष दौंड, सिएट लिमिटेडचे सुनील झा, श्रीनिवास पत्की, अलियान वाझ, सुमेद्य वैद्य आदी उपस्थित होते.

भिमनवर म्हणाले, वेग मर्यादचे उल्लंघन, फार काळ विश्रांती न घेता वाहन चालविल्यास रस्ता संमोहन होऊन अपघात, वाहन सुस्थितीत नसणे या तीन कारणांमुळे समृध्दी महामार्गावर अपघात होत आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविणार्‍या वाहन चालकांचे समुपदेशन करण्यासाठी परिवहन विभागाने समृध्दी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन केली आहेत. आत्तापर्यंत तीन हजारांहून अधिक वाहनधारकांचे यामध्ये समुपदेशन करण्यात आल्याचे आयुक्त भिमनवर यांनी यावेळी सांगितले.
तपासणी केंद्रावर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

Back to top button