नगर : औटेवाडीकरांची तहान भागणार ! जलजीवनमुळे पाषाणालाही फुटले पाझर | पुढारी

नगर : औटेवाडीकरांची तहान भागणार ! जलजीवनमुळे पाषाणालाही फुटले पाझर

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही कामासाठी प्रामाणिक प्रयत्नांबरोबरच प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. अगदी तसेच औटेवाडीकरांच्या बाबतीतही झालं. पूर्वी पुनर्वसन विभागाने थेट नदीत विहिर घेतली मात्र आजही ती कोरडीच. बोअरवेल्स मारले तरी फुफाटाच. कारण मुळातच या गावातील भूगर्भात सर्वत्र काळा पाषाण, त्यामुळे लोकांनीही बोअरवेल्स, विहिरींचा जणू नाद सोडून दिला. मात्र जलजीवन ही महत्वकांक्षी योजना आली, त्यातून सर्व्हे झाला आणि विहिर खोदली गेली आणि पाहता पाहता अगदी 35 फुटांवरच विहिरीला पाणी लागताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. आता याच विहिरीतून टाकीत पाणी आणून, तेथून थेट ग्रामस्थांच्या घरापर्यंत पाणी देण्यासाठी प्रशासनाने गती दिली आहे.

औटेवाडी हे कर्जत तालुक्यातील छोटेसे गाव. साधारणतः 1 हजार लोकसंख्या आणि 250 कुटूंब असलेली ही वाडीच. येथे स्वतंत्र ग्रामपंचायतही आहे. उजनी उशाला आहे, पण येथील ग्रामस्थांच्या घशाला उन्हाळ्यात कायमच कोरड पहायला मिळत. ग्रामपंचायतीने दोन बोअरवेल्स घेतले होते. मात्र त्याला अपेक्षित पाणी लागले नाही, ते पिण्यासाठी किती योग्य, हाही प्रश्नच. तरीही ग्रामस्थ याच पाण्यावर अवलंबून होते. यापूर्वी 1973 मध्ये पुनर्वसन विभागाने येथे विहिर घेतली होती. मात्र त्यातही यश आले नाही. आज ही विहिर कोरडीठाक आहे. अशावेळी गावात नळ असूनही पाणी नव्हते. मात्र जलजीवन योजनेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांनी उपअभियंता माने व त्यांच्या टीम सोबत व भूजल विभागाच्या मदतीने विहिरीसाठी जलस्त्रोत निवडला. त्यावर ठेकेदाराने विहिर खोदली आणि चमत्कार घडावा तसाच काळ्या पाषाणातूनही 35 फुटावंरच पाणी लागले. आता या पाण्यातून औटीवाडीकरांची तहान भागविली जाणार आहे. 25 हजार लिटरची पाण्याची टाकी उभारली, गावात सुसज्ज वितरण व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलरवर चालविली जाणार योजना
विजेची आणि परिणामी ग्रामपंचायतीची आर्थिक बचत करण्यासाठी सोलर प्लॅन्टवर ही योजना चालविली जाणार आहे. स्वतः सीईओ येरेकर हे योजनेच्या पूर्णत्वाकडे व सोलर संनियंत्रणाकडे लक्ष ठेवून असून, तशा ठेकेदाराला सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच गावकर्‍यांच्या दारात आणि घरात जलजीवन मिशनमधून सोलर योजनेव्दारे पिण्यासाठी पाणी पोहचलले दिसणार आहे.

औटेवाडी परिसरात काळा पाषाण असल्याने विहिरी किंवा बोअरवेल्स घेताना छातीवर दगड ठेवावा लागत. अनेक बोअर कोरडे गेलेले आहेत. मात्र जलजीवनच्या विहिरीला सुदैवाने पाणी लागले आहे. त्यामुळे आता आमची उन्हाळ्यातील चिंताही मिटली आहे.
                                                                  – देविदास महाडिक, सरपंच

Back to top button