नगरमधील नेवासा तालुक्यात कूपनलिका कोरड्याठाक पडल्याने पाण्यासाठी पायपीट

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शेती पिकाला पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे खात्याने पाट व पोट चार्या करुन शेतकर्यांच्या शेतावर थेट पाणी उपलब्ध होण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. मात्र या पाटचार्या उद्धवस्त करुन आता या चार्यांवर मोठ्या इमारती उभा राहील्यामुळे पाटाचे पाणी नाहीसे झालेले असून, कूपनलिकाचे पाणी आटल्यामुळे पाटाला पाणी येवूनही त्यास फायदा होत नसल्यामुळे नेवासा फाटा व परिसरात पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे.
सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करुन या पाट व पोट चार्या तयार केलेल्या असतांना या चार्याच आता अस्तित्वात नसल्यामुळे अनेकांचे कूपनलिका कोरडेठाक पडल्या आहेत. आता पाटपाणी येवूनही चार्या नसल्यामुळे कूपनलिकामध्ये पाण्याचे स्रोत वाढत नसल्यामुळे या पाटचार्या गायब करणार्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत आहे.
शासनाच्या मुळा पाटबंधारे खात्याने शेतकर्यांच्या शेतावर थेट पाणी जाण्यासाठी पाट व पोट चार्याची निर्मिती केलेली आहे. मात्र अनेक धनिकांनी कायदा धाब्यावर बसवून या चार्यांवर इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे शेतीलाही पाणी मिळत नाही आणि कूपनलिका कोरडेठाक होवून ते चालू होण्यासाठी या चार्याच गायब झाल्यामुळे पाझरही येत नसल्यामुळे सर्वञच सध्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. पाणी बचतीचे धडे शिकविणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करुन तात्विक धडे देण्यात अर्थ काय ? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पाणी वाचविण्याचे महत्व पटवून देण्याबाबत दुमत नाही मात्र सरकारने तिजोरीवर भार देवून निर्माण केलेल्या चार्याच जर नाहीश्या केल्या असतील तर जलमित्रांंनी या गंभीरबाबींकडेही सामाजिक हित लक्षात ठेवून लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी नसतांना पाणी कसे वाचवावे ? हे सांगण्यात नेमका अर्थ काय ? त्यासाठी तळमळीने पाट व पोटचार्या गायब करणार्यांवर जनतेचा रेटा बरोबर घेवून आंदोलनातून लढा उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.
पाणी हे एक नैसर्गिक संसाधन असून सजिवांच्या अस्तित्वासाठी पाणी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी पाणी बचावाचे धडे देण्यापेक्षा पाण्याचे स्रोत गायब करणार्यांवर कायदेशीर मार्गाने लढा उभारणे गरजेचे आहे पाटचार्या गायब झालेल्या असतांना संबंधित पगारी अधिकारी डोळे मिटवून शांत का, असा संतप्त सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे. याबाबत आता जनहित याचिकाच न्यायालयात दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शेतकर्यांनी दिली आहे.
दुरूस्तीसाठी खर्च, तरीही पाणी वाया !
चार्यांवर मुळा पाटबंधारे विभागाकडून दुरूस्तीवर दरवर्षी मोठा खर्च होतो. तरीही सदरच्या चा-या काट्यांच्या विळख्यात अडकल्या आहेत. पाणी वायाला जात आहे. पाणी वापर संस्थांच्या नावाखाली अधिकारी वर्ग सुस्त बनले आहेत