पार्किंगने पादचारी रस्ते झाकोळले ! | पुढारी

पार्किंगने पादचारी रस्ते झाकोळले !

श्रीकांत राऊत : 

नगर : शहरात सुरळीत वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेची आहे. परंतु, या दोन्ही घटकांत समन्वयाचा अभाव असल्याने शहरात बेशिस्त पार्किंग आणि पादचारी रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पादचारी रस्ते चक्क गायब झाल्याचा अनुभव नगरकरांना येतोय. पोलिस आणि पालिका प्रशासनाच्या वर्षानुवर्षे जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे नगरकर बेजार झाले असून, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

शहरातील जुना कापड बाजार, कापड बाजार, मोची गल्ली, घास गल्ली, माणिक चौक परिसरातील प्रमुख रस्ते कायम गजबजलेले असतात. बाजारपेठेत येणार्‍या नागरिकांची चारचाकी, दुचाकी वाहने बेशिस्त पद्धतीने पार्क केली जातात. त्यामुळे या परिसारत कायम वाहतूक कोंडी असते. हीच परिस्थिती आता नव्याने वाढलेल्या आणि शहराचा भाग झालेल्या उपनगरांमध्येही पहायला मिळते. मनपान रस्ता, सावेडी नाका, प्रोप्रेसर कॉलनी चौक, तारकपूर, भिस्तबाग चौक, प्रेमदान चौक परिसरातील पादचारी मार्ग चक्क गायब झाले आहेत. व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यामुळे नागरिकांकडून दुचाकी, चारचाकी वाहने पादचारी मार्गावर उभी केली जातात. परिणामी रस्त्याने चालणार्‍या नागरिकांना पादचारी मार्ग नसल्याचे चित्र आहे. मात्र, या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

पोलिस अधिकारी म्हणातात..स्टाफ नाही
बेशिस्त पार्किंग, पादचारी मार्गावर वाहने उभी करणार्‍यांवर वाहतूक शाखेकडून कधीमधी कारवाई होते. परंतु, ही कारवाई जुजबी ठरत आहे. दैनिक ‘पुढारी’ने वाहतूक शाखेचे प्रमुख मोरेश्वर पेंदाम यांना पादचारी मार्गावरील पार्किंगबाबत विचारणा केली असता, ‘वाहतूक शाखेत पुरेसे मनुष्यबळच नाही’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता नगरकरांनी हक्काची पदपथ खुली करण्यासाठी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न आहे.

वाहने लावण्यासाठी रस्त्यांचा वापर
वाहने लावण्यास जागाच नसल्याने पार्किंगसाठी सर्रास रस्त्याचा वापर केला जातो. अनेक दुकानदार स्वत:ची वाहने, ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क करतात. शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, याकडे वाहतूक पोलिस व महानगरपालिकेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष्य होत आहे.

रिक्षाचालकांचा तोरा न्याराचं..!
शहरात वाहतुकीच्या नियमांना सर्रास हरताळ फासला जातोय. कोणत्या चौकात कोण, कुठून कसा येईल याचा नेम नाही. त्यामुळे दररोज अपघात ठरलेले आहेत. यात भर म्हणजे रिक्षाचालकांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण पोलिसांचे राहिलेले नाही. माळीवाडा, तारकपूर, दिल्लीगेट, रेल्वेस्थानक या ठिकाणी रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाचा अनुभव नगरकारांना कित्येकदा येतो. वाहतुकीचे नियम यांना नाहीत असा तोरा या रिक्षाचालकांचा असतो, त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांनाही वठणीवर आणण्याची आवश्यकता आहे.

हे ही वाचा : 

https://pudhari.news/latest/564515/ncpcr-investigate-cases-of-children-being-converted-through-gaming-demand-for-ncpcr-from-the-centre/ar

https://pudhari.news/maharashtra/kolhapur/564501/shrimant-shahu-chhatrapati-maharaj-comments-on-kolhapur-incident/ar

Back to top button