नगर : ‘आयुष’ विद्युतीकरणाला 45 लाखांची ऊर्जा ! | पुढारी

नगर : ‘आयुष’ विद्युतीकरणाला 45 लाखांची ऊर्जा !

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर येथील राष्ट्रीय आयुष मिशनच्या ‘आयुष’ रुग्णालयातील निधीअभावी अडलेले विद्युतीकरण व फर्निचरचे काम लवकरच सुरू होणार आहे. यातील विद्युतीकरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून 45 लाखांची प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे समजले. आयुष रुग्णालयाचे काम तीन वर्षे झाली तरी अद्याप अपूर्ण आहे. बांधकाम झाले असले तरी विद्युतीकरण व फर्निचरसाठी निधी नसल्याने हे काम आडले असल्याकडे दै.पुढारीने शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा नियोजनमधून विद्युतीकरणाच्या कामासाठी 45 लाखांची प्रशासकीय मान्यता दिल्याचे समजले आहे. यामध्ये 19 लाख रुपये रोहित्रासाठी तरतूद असून, लिफ्टकरिता 25.45 लाखांची प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आता फर्निचरचे काम बाकी आहे. त्यासाठीही 75 लाखांचा निधी लवकरच देण्याचे संकेत मिळाले आहेत.

 

Back to top button