नगर : कापडबाजार, चितळे रोड मिरवणुकांसाठी बंद | पुढारी

नगर : कापडबाजार, चितळे रोड मिरवणुकांसाठी बंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गणेशोत्सव विसर्जन, कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन या पारंपरिक तीन मिरवणुका वगळता भविष्यातील सर्व मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- इंपिरियल चौक- माळीवाडा वेस- आयुर्वेद कॉर्नर- अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्ली गेट या मार्गाने नेण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला असून, या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठी 30 जूनपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

अहमदनगर शहराच्या हद्दीत डीजे, डॉल्बी सिस्टिम लावून शोभायात्रा, मिरवणुका आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- माळीवाडा वेस- पंचपीर चावडी- तख्ती दरवाजा- कापड बाजार ते तेलीखुंट-चितळे रोड- चौपाटी कारंजा ते दिल्ली गेट या मार्गाने काढण्यात येतात. मात्र, या मिरवणूक मार्गातील रस्ते लहान आहेत. मिरवणुकीत विविध मंडळांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या पुतळ्यांची उंची 15 फुटांपेक्षा जास्त असल्याने मिरवणूक मार्गावरील विद्युततारा व दूरध्वनीच्या तारांमुळे अडथळा निर्माण होत आहे.

त्यामुळे पोलिस यंत्रणेमार्फत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 33 (ओ) अन्वये भविष्यातील मिरवणुका व भविष्यकालीन परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवूनपर्यायी मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. आगामी कालावधीत श्री गणेशोत्सव विसर्जन, कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन या पारंपरिक उत्सव मिरवणुका वगळता कापड बाजारातून सर्व प्रकारच्या मिरवणुका न नेता प्रशासकीय सोयीसाठी नवीन मिरवणुकीच्या मार्गाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी 30 जूनपर्यंत लेखी स्वरूपातील सूचना अथवा हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. मुदतीनंतर सूचना अथवा हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

का बदलला जातोय मिरवणुकीचा मार्ग
मिरवणूक मार्गावर हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकवस्ती आहे. या ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद होऊन जातीय तेढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे एकमेकांविषयी द्वेषभावना वाढीस लागल्याचे निदर्शनास येत आहे. आतापर्यंत सर्वच मिरवणुका कापड बाजारातून जात आहेत. त्यामुळे बॅरिकेडिंगमुळे व्यावसायिकांना व्यवहार बंद ठेवावे लागतात. त्यामुळे ग्राहक व व्यापार्‍यांच्या मनात नाराजी निर्माण झालेली असून, ते रोष व्यक्त करत आहेत. यापूर्वी झालेल्या काही मिरवणुकांत दगडफेक, खुनी हल्ले, असे अनुचित प्रकार घडलेले आहेत. या कारणांमुळे जुना मार्ग बदलून नव्या मार्गाचा प्रस्ताव मिरवणुकांसाठी ठेवण्यात आला आहे.

Back to top button