

पोहेगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील झगडे फाटा चौफुलीवर सध्या रस्त्याचे काम सुरू असून वाहन चालकांना आपल्या वेगावर नियंत्रण ठेवता येत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल सकाळी दहा वाजता अशाच आयशर टेम्पो चालकाचे वाहनावर नियंत्रण नसल्याने टेम्पो पलटी झाला सुदैवाने तेथे जीवित हानी झाली नाही. वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडल्या तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या परिसरात रोडवर सफेद साईटपट्टे मारावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
काल संभाजीनगर येथुन भरगाव वेगाने चाललेला टेम्पो (एमएच 20 जीसी 5558)रद्दी घेऊन नाशिकच्या दिशेने जात होता. टेम्पो झगडेफाटा येथे आल्यावर टेम्पो चालकाला आपल्या गतीचा अंदाज आला नाही व समोर चौफुली असल्याने त्याचे वेगावरील नियंत्रण सुटले व टेम्पो उलटला. या ठिकाणी दररोज रिक्षा व बस स्टॅन्डकडे प्रवाशी उभे असतात. मात्र नेमके त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने जीवितहानी टळली.