‘निळवंडे’ चे पाणी आल्याचे समाधान मानावे : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

‘निळवंडे’ चे पाणी आल्याचे समाधान मानावे : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  निळवंडे कालव्यातून पाणी येण्याचा आनंद हा एखाद्या सण उत्सवापेक्षाही मोठा आहे. अनेक वर्षांनंतर या भागातील शेतकर्‍यांची प्रतिक्षा संपली आहे. या विषयावर आरोप-प्रत्यारोप आणि टीका टिपण्णी करण्यापेक्षा सर्वांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे समाधान सर्वांनी मानले पाहीजे, अशी भावना महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. जिरायती भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी तालुक्यातील गोगलगाव आणि आडगाव या लाभक्षेत्रातील गावांमधून मार्गस्थ झाले. या गावातील ग्रामस्थांनी पाण्याची विधीवत पूजा करत आनंद साजरा केला.

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंह, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक, अभियंता कैलास ठाकरे, विवेक लव्हाट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांसह विखे पा. यांनी कालव्यामध्ये उतरुन पाण्याचे पुजन केले. महिलांनी अतिशय उत्साहाने पाण्याचे पुजन आणि औक्षण करुन या क्षणाचा आनंद व्दिगुणीत केला. 31 मे रोजी निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडून प्रथम चाचणी करण्यात आली. अवघ्या 7 दिवसात 85 कि.मी चा प्रवास करुन हे पाणी आता कालव्याच्या माध्यमातून पुढे जात आहे.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पा. यांच्यापासून या धरणाच्या निर्मितीला प्रारंभ झाला. मात्र त्यानंतर अनेक कारणांनी या प्रकल्पाचे काम रखडले. मात्र राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना खर्‍या अर्थाने या कालव्यांच्या कामांना चालना मिळाली. यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेही सहकार्य मिळाले. आता पुन्हा राज्यात युतीचेच सरकार असल्याने या कामातील सर्व अडथळे दुर झाल्याने या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले.

या प्रकल्पाच्या कामासाठी सर्वांचेच सहकार्य मिळाले. कुठेही श्रेयवादाची लढाई नाही, आमच्यावर जाणीवपुर्वक आरोप करणार्‍यांना आता पाणी आल्यामुळे उत्तर मिळाले आहे. त्यामुळे किंतू परंतू मनात न ठेवता खुल्या दिलाने या ऐतिहासिक क्षणाचे समाधान सर्वांनीच व्यक्त करावे. माजी मंत्री म्हस्के म्हणाले, गेली अनेक वर्षे या रखडलेल्या प्रकल्पाचे काम आता मार्गी लागल्याने सर्वांच्या आशा आकांक्षा पुर्ण झाल्या आहेत. राज्यातील युती सरकारने या प्रकल्पासाठी मोठे सहकार्य केले. त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे अभिनंदन करत आभार मानले.

हे ही वाचा : 

https://pudhari.news/maharashtra/nashik/564186/nashik-dog-sterilization-started-today/ar

https://pudhari.news/maharashtra/nashik/564209/nashik-horrific-accident-in-kasara-ghat-two-jain-sadhvi-women-died/ar

 

Back to top button