

खेड (नगर), पुढारी वृत्तसेवा: सुसाट झालेल्या कर्जत-बारामती राज्यमार्गावर आता काटेरी झुडुपांनी तोंड वर काढले आहे. राज्यमार्गाच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडा-झुडुपांनी व्यापून गेल्या आहेत. यामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने याबाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या याच राज्यमार्गावर तीन महिन्यात असंख्य अपघात झाले आहेत. अनेकांचा या अपघातांमध्ये मृत्यू झाला असून, अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
राज्यमार्गावरून एकाच वेळी दोन वाहने जाताना साईड पट्ट्यावरून जाणार्या दुचाकींना काटेरी झुडुपांमुळे वाहने चालवण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्ता सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडण्यासाठी संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिल अदा केले जात नाही, असे असतानाही ठेकेदार या बाबींकडे दुर्लक्ष करत असेल तर याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
राज्यमार्गाला काही ठिकाणी मोठी वळणे आहेत. अशावेळी समोरून आलेले वाहन बाभळीमुळे दिसत नाही आणि बाभळीच्या फांद्यांचा फटका वाहनचालकांना बसतो. दुखापत होऊ नये म्हणून अनेक वाहनचालक अचानक आपली वाहने रस्त्याच्या मध्यभागातून चालवतात आणि मागून येणार्या वाहनांचा अपघात होतो. पावसाळा तोंडावर आल्याने ही झुडुपे वाढणार आहेत. यामुळे प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन रस्त्यावर डोकावणार्या काटेरी बाभळी तत्काळ काढून टाकून रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी करत आहेत.
हेही वाचा: