मेगाभरती! अहमदनगर महापालिकेत दोन महिन्यांत भरणार 134 जागा

मेगाभरती! अहमदनगर महापालिकेत दोन महिन्यांत भरणार 134 जागा
Published on
Updated on

नगर, पुढारी वृत्तसेवा: अहमदनगर महापालिकेत येत्या दोन महिन्यात कर्मचारी-अधिकार्‍यांची मेगाभरती होणार आहे. आस्थापना खर्चामुळे गेल्या 18 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया होत आहे. बाह्य संस्थेमार्फत होणार्‍या भरती प्रक्रिया करारासाठी हालचाली सुरू आहेत. करार झाल्यानंतर येत्या दोन महिन्यात 134 कर्मचारी-अधिकार्‍यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

महापालिकेत गेल्या वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे विविध विभागात कर्मचार्‍यांची वानवा आहे. तर, एका अधिकार्‍याकडे दोन-तीन विभागांचा पदभार आहे. कर्मचारी व अधिकारी नसल्याने त्याचा मनपाचा कामकाजावर परिणाम होत होता. लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून कर्मचारी भरतीची मागणी करीत होते. मात्र, महापालिकेचे उत्पन्न आणि आस्थापना खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. आस्थापना खर्च हा 35 टक्क्यांच्या पुढे जात होता. त्यामुळे नगरविकास विभाग महापालिकेला कर्मचारी भरती करण्यास मंजुरी देत नव्हता. त्यामुळे आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभगात गेल्या कित्येक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे. त्यात बाह्य संस्था वेळेत त्या कर्मचार्‍यांना पगार देत नसल्याने अनेक वेळा काम बंद होत असल्याने त्याचा मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता.

महापालिकेत 2870 पदे मंजूर आहेत. तर, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1200 कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात अवघ्या 135 कर्मचार्‍यांची भरती करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. टीसीएल कंपनीमार्फत भरती प्रक्रिया करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यासाठी कंपनीशी संपर्क करून करार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. टीसीएलशी करार झाल्यानंतर दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

पदे व संख्या:

स्त्रीरोग तज्ज्ञ 1, भूलतज्ज्ञ 1, पर्यावरण संवर्धन अधिकारी 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)2, अभियांत्रिकी सहायक 8, आरेखक/आर्किटेक्चरल असिस्टंट 1, संगणक प्रोग्रॅमर 1, विद्युत पर्यवेक्षक 3, पाणी लॅब टेक्निशियन 6, लॅब टेक्निशियन 1, लॅब असिस्टंट 6, प्रदूषण नियंत्रण अधिकारी 1, पशुधन पर्यवेक्षक 1, लघुटंकलेखक 2, कनिष्ठ विधी अधिकारी 2, समाज विकास अधिकारी 1, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर 12, सब ऑफिसर 1, चालक/ऑपरेटर 20, फायरमन 50, लिपिक टंकलेखक 13.

महापालिकेत पदभरतीसाठी परीक्षा पद्धती राबविण्यासाठी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार झाला आहे. संबंधित कंपनीकडून करारनाम्याचा मसुदा आला असून, तो तपासणीसाठी दिला आहे. करारनामा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
-डॉ. पंकज जावळे, आयुक्त मनपा

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news