नगर: संगमनेरमध्ये ‘मोर्चा’ला गालबोट; दोन गटात दगडफेक, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात | पुढारी

नगर: संगमनेरमध्ये 'मोर्चा'ला गालबोट; दोन गटात दगडफेक, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संगमनेरमध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. पण या मोर्चाला गालबोट लागलं असून संगमनेरच्या समनापूर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत चार चाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यात २ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

मोर्चा पार पडल्यानंतर गावाकडे परतत असताना दोन गटात दगडफेक झाली. सध्या समनापूर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघ चौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, देविदास ढुमणे यांच्यासह वरिष्ठ पालिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

हा वाद का झाला? याची माहिती पोलीस घेत असून सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी तणाव पूर्ण शांतता असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

Back to top button