अकोले : कालव्यांची गळती न थांबल्यास आंदोलन : आ. डॉ. लहामटे | पुढारी

अकोले : कालव्यांची गळती न थांबल्यास आंदोलन : आ. डॉ. लहामटे

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी निळवंडे धरणातून कालवे चाचणीसाठी सोडलेले पाणी व गळती थांबण्याच्या उपाय योजना तातडीने करा. कालव्यांचे गरजेच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करून अस्तरीकरण करा. कालव्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या मिटल्या, अशी निंब्रळ ते कळस दरम्यानच्या गावातील ग्रामपंचायतींची एनओसी घेतल्यावरचं कालव्यांमधून पाणी न्यावे, अन्यथा शेतकर्‍यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

निळवंडे कालवे चाचणीसाठीचे पाणी सोडण्यात आले. 100 क्युसेकने पाणी डाव्या कालव्यातून लाभक्षेत्राकडे झेपावताना गुरूवारी सायंकाळी मेहेंदुरी शिवारात कालव्याला गळती लागल्याचे स्थानिक शेतकर्‍यांच्या लक्षात आले. शेतीसह घरांमध्ये पाणी शिरले. रस्ते पाणथळ झाले. परिसरात शेतकरी व जलसंपदाच्यावतीने पाटात प्लास्टिक फाळे टाकून पाण्याचा पाझर थांबविण्याच्या उपाय- योजना केल्या.

दरम्यान, शुक्रवारी आ. डॉ. किरण लहामटे यांनी मेहेंदुरी, बहिरवाडी फाटा परिसरात जावून गळतीची पाहणी केली. यावेळे आ. डॉ. लहामटे यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. तालुक्यातील कालवे शेत जमिनीपासून 40 ते 45 फुट उंचावर आहेत. टांगणीला कालवे असल्याने पाणी मातीत मुरून अती पाणी पाझरू लागले आहेत. कालव्यातून पाणी पुढे सरकते तशा अडचणी लक्षात येत आहेत. तालुक्यातील शेती पाणथळ होवू नये म्हणून डोंगर टेकडीच्या व मुरमाच्या ठिकाणी कालवे अस्तरीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मेहेंदुरी सोसायटीचे चेअरमन अरूण फरगडे, माजी सरपंच भाऊसाहेब येवले, डॉ. सतीश चासकर, सुनील आरोटे, डॉ. अविनाश कानवडे, विकास बंगाळ, शिवाजी आरोटे, कैलास फरगडे, सकाहरी येवले आदी शेतकर्‍यांसह आ. लहामटे यांनी कार्यकारी अभियंता प्रमोद माने व अधिकार्‍यांशी संवाद साधुन समस्या मांडल्या.

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीतून प्रश्न मार्गी लावू : लोखंडे

निळवंडे कालव्यालगत व प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या अडचणी व मागण्यां संदर्भात जलसंपदाच्या अधिकार्‍यांकडून प्रस्ताव करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या 20 दिवसांत भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू. आपण शेतकर्‍यांना दिलेले शब्दाबाबत दिलासा देण्याचे काम करू. निळवंडे कालव्याच्या कामात काही ठिकाणी भराव जमिनीपेक्षा खूप मोठा आहे. 40 फूट उंच भराव असल्याने पाण्याचा पाझर झाला. ज्या ठिकाणी भराव उंच त्या ठिकाणी लिकेज जास्त झाले. लिकेज बंद करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्याचे खा. सदाशिव लोंखडे यांनी सांगितले.

हेही वाचा

बारामती महाविद्यालयाला अहिल्यादेवींच्या नावामुळे नवीन उर्जा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

Back to top button