जामखेडकरांच्या डोळ्यांचे शिवसोहळ्याने पारणे फेडले | पुढारी

जामखेडकरांच्या डोळ्यांचे शिवसोहळ्याने पारणे फेडले

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून जामखेड शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा 2 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त जामखेड शहरात 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानुसार 31 मे रोजी ‘सुवर्ण क्षण महाराष्ट्राचे’ हे महानाट्य स्थानिक कलाकारांनी सादर केले. दि. 1 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले होते त्यात 350 युवा रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच संगीत सम्राट फेम युवा शाहीर रामानंद उगले यांचा शिवदर्शन पोवाडे व महाराष्ट्र शौर्यगीतांचा कार्यक्रम जुन्या तहसील कार्यालयासमोर झाला.

2 जून रोजी पहाटे 5 वाजता गडकोट किल्ले व तीर्थक्षेत्रावरील तीर्थ, तसेच सप्तनद्यांचे पवित्र जल तसेच दुग्धाभिषेक, वेदमंत्रांत शिवराज्याभिषेक करण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गणपती मंदिरात आरती करून प्रत्येक पथकाने सलामी देत बीड रोडवरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यात देशभरातील नामांकित विविध पथकांनी जामखेडकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

जवळपास 1 किलोमीटरपर्यंत शिवप्रेमींची उपस्थिती होती. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जामखेड भगवेमय झाले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी सर्वाना एकत्र घेऊन उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन वेगवेगळ्या पथकातील वाद्यांचा आस्वाद घेतला.

शिवराज्याभिषेकाचे महत्त्व : पांडुरंग भोसले

2 जून रोजी याच तिथीला शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला. सर्व सण एका बाजूला आणि शिवराज्याभिषेक एका बाजूला, एवढे या सणाचे महत्त्व आहे. त्यामुळे हा सण उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत, असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी सांगितले.

मल्लखांब, लाठीकाठी व केरळचे ढोलपथक

रोप मल्लखांब मुलींचे, तसेच मुलांचे मल्लखांब पथक, लाठीकाठी शस्त्रपथक, केरळचे ढोल वाद्यपथक, विविध राज्यांतील हलगी पथक, संबळ पथक, नंदी पथक, लेझीम पथक तसेच श्री राम मंदिराची प्रतिकृती मिरवणुकीतील विशेष आकर्षण होते. अश्व पथक, पारंपरिक वेशातील मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या वेशात शिवप्रेमी, तसेच विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज तसेच तानाजी मालुसरे, श्री राम, आहिल्यादेवी होळकर, हनुमान यांच्या मूर्ती मिरवणुकीचे आकर्षण होत्या. भव्य दिव्य असा भगवा ध्वज हातात घेऊन चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

जामखेडच्या सोहळ्याची राज्यात नवी ओळख

नागपंचमीसह विविध कारणांनी जामखेडची राज्यात ओळख आहे. परंतु गेल्या काही वर्षांत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड यांच्याकडून तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी तालुक्यात तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी हजारो शिवप्रेमी सहभाग नोंदवितात. या सोहळ्यासाठी राज्यातील नव्हे तर देशभरातील नावाजलेले ढोलपथक, वाद्यपथक आणले जात आहेत. त्यामुळे जामखेडच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची राज्यात नवी ओळख झाली आहे.

Back to top button