दहिगाव ने : वारं सुटलं, काळीज तुटलं; क्षणात स्वप्न भंगलं, केळी पिकासह फळबागा जमीनदोस्त | पुढारी

दहिगाव ने : वारं सुटलं, काळीज तुटलं; क्षणात स्वप्न भंगलं, केळी पिकासह फळबागा जमीनदोस्त

दहिगाव ने(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सुसाट वारं सुटलं, काळीज तुटलं, डोक्यावरचं छत उडालं. एका क्षणात स्वप्न भंगलं. शेतकर्‍यांनी डोक्यावर कर्ज ठेवून केळी पिकासह मोठ्या फळबागा उभा केल्या. कालच्या वादळी वार्‍याने जमीनदोस्त झाल्या. अनेकांच्या घरांवरील छत उडाल्याने संसार उघड्यावर पडले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, रांजणी, मठाचीवाडी शहरटाकळी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले त्यांनी केली.

शेतकर्‍यांना धीर देत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली. शेवगावचे तहसीलदार राहुल गुरव यांच्यासह मंडळ अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तलाठी बाळासाहेब केदार, आठरे भाऊसाहेब कृषी सहायक सूर्यकांत काकडे, प्रशांत बरबडे या प्रशासकीय अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी रांजणीचे संरपंच काकासाहेब घुले, सतीश धोंडे, मिलिंद कुलकर्णी, विष्णू जगदाळे आदी उपस्थित होते. मागील अवकाळी पावसामुळे कांदा, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई अजूनही शेतकर्‍यांना मिळालेली नाही. या आसमानी संकटातून सावरत नाही तोच तोंडी आलेला घास काल झालेल्या सुसाट वादळी वार्‍याने हिरावला. पुन्हा शेतकर्‍यावर सुलतानी संकट कोसळले आहे. शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राजकारणी, प्रशासकीय अधिकारी नुसत्याच भेटी देत आहेत. मात्र, शेतकर्‍यांच्या झोळीत आश्वासनाशिवाय काहीच पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नैसर्गिक संकटात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे तत्काळ पंचनामे करून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अहवाल सादर करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ. त्यादृष्टीने प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

-राहुल गुरव
– तहसीलदार

मागील अतिवृष्टीचे अनुदान अजूनही बर्‍याच शेतकर्‍यांना मिळाले नाही. शेतकरी आर्थिक संकटात असताना हे गतिमान सरकार करतेेय काय? तत्काळ नुकसानभरपाई न मिळाल्यास शेतकन्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करू.

-डॉ. क्षितिज घुले

Back to top button