अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वार्‍याचे थैमान! नेवासा तालुक्यात उडाले पत्रे | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वार्‍याचे थैमान! नेवासा तालुक्यात उडाले पत्रे

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रविवारी पाऊस कमी अन् वादळ जास्त झाल्याने ठिकठिकाणी पत्रे उडून पडले. तर, अनेक रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली. यामुळे नुकसान झाले आहे. नेवासा तालुक्याला वादळी वार्‍याने चांगलेच झोडपले.
दुपारी 1 वाजता अचानक सुसाट वारा सुटल्याने नेवासा शहरात आठवडे बाजार असल्याने बाजारकरुंची त्रेधातिरपीट उडाली होती. बाजारपाल उडून गेले. दुकानांतील भाजीपाला व खाऊंची मिठाई अस्तव्यस्त झाल्याने सर्वाचींच तारांबळ उडाली.

हवेत धुळीचे लोट उडाले होते. यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. शहरातील नोला मँकहेन्री मेमोरियल स्कूलच्या(एसडीए शाळा) छताचे पत्रे वादळाने उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या शाळा बंद असल्याने जीवितहानी झाली नसल्याचे प्राचार्य रावसाहेब बत्तीसे यांनी सांगितले. तसेच, शहरातील बसस्थानकावरील वार्‍याने मिठाईचे डबे, पराती पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे अमोल सुरोशे यांनी सांगितले. बाजारकरुंचे वादळाने चांगलेच हाल झाले. नेवासा फाट्यावर अनेक ठिकाणी वादळाने नुकसान झाले.

रिकाम्या जागांवर असलेले कंपाऊंड पडले. घराला भिंतीचे व तारेचे वाँलकंपाऊंड वादळाने पडल्याचे देविदास साळुंके यांनी सांगितले. रस्त्यावरून दुचाकी चालताना वार्‍याच्या वेगाने गाडीसह रस्त्यावरील माणूस ओढला जात होता. वादळासह अवकाळी पावसाचा नेवासा शहरासह भेंडा, कुकाणा, खडका, नेवासा फाटा, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, सोनई आदी भागात कमी अधिक प्रमाणात फटका बसला. फळबागांचे नुकसान झाले. रस्त्यावर ठिकठिकाणी जोरदार वादळाने झाडाच्या फांद्या, तसेच काही झाडे उन्मळून पडली आहेत.

सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित

आंब्याच्या झाडांखाली कैर्‍यांचा सडा पडला आहे. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. तालुक्यात वादळाने झाडे पडून पत्रे उडून व वीजांच्या खांबाचे तारा तुटल्या आहेत. तालुक्यात वादळाने नुकसान झाले असले तरी जीवितहानी मात्र झाल्याची माहिती नाही. मोसमी पावसा अगोदरच वादळी वार्‍याने सर्वांची दाणादाण केली.

Back to top button