अहमदनगर : पांढरीपूल परिसर बनला अपघात केंद्र; रस्त्यावर ठिकठिकाणी पडले खड्डे | पुढारी

अहमदनगर : पांढरीपूल परिसर बनला अपघात केंद्र; रस्त्यावर ठिकठिकाणी पडले खड्डे

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. पांढरीपूल परिसर तर अपघातांचा केंद्रबिंदूच बनला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अनेक लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मोठ्या वाहनांचेही अपघात होत आहेत. अशा विविध अपघातांमध्ये आतापर्यंत अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर येऊनदेखील प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही हे विशेष.

शेंडी, धनगरवाडी, जेऊर परिसरात महामार्गावर अनेक खड्डे पडलेले आहेत. जेऊर येथील तरुणांनी माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माती जास्त दिवस राहत नसल्याने खड्डे उघडे पडले आहेत. खड्ड्यांनी रोज अपघात घडत आहेत. चौकाचौकांमध्ये आवश्यक सूचनाफलक, लाईट कटर, गतिरोधक, सिग्नल, रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे देखील अपघातांची संख्या वाढतच आहे.

पांढरीपूल तर अपघातांचे केंद्रबिंदू बनले आहे. येथे अपघातांची मालिकाच सुरू आहे. इमामपूर घाटातील तीव्र उतार अन् चालकाकडून वाहन न्यूट्रल करण्यात येत असल्याने चौकात दररोज अपघात घडत आहेत. शुक्रवारी (दि.2) सकाळी पांढरीपूल मुख्य चौकातच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पांढरीपूल परिसरात सिग्नल, घाटात सूचनाफलक तसेच अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या महामार्गाच्या गरज असलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम तत्काळ करावे. तसेच अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी महामार्गालगतच्या नागरिकांमधून करण्यात येत आहे.

आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. चौकात सिग्नल, दिशादर्शक फलक बसविण्यात आलेले नाहीत. वारंवार मागणी करूनदेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी तत्काळ यात सुधारणा झाली नाही तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर यांनी दिला आहे.

Back to top button