लोणी : अतिवृष्टी नुकसानीची भरपाई आठवड्यात : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा | पुढारी

लोणी : अतिवृष्टी नुकसानीची भरपाई आठवड्यात : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्यामुळेच लोकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे, असे सांगत, सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होईल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना दिली.

मंत्री विखे पा. यांनी वाकडीसह पंचक्रोशित बैठकांचे आयोजन करून, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा आढावाही त्यांनी अधिकार्‍यांकडून घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. वाड्या- वस्त्यांवरील रस्त्यांच्या समस्यांबाबत अधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण सूचना देऊन रस्त्यांसाठी उपलब्ध निधीची माहिती ग्रामस्थांना दिली.

वीज वितरण कंपनीबाबत भेडसावणार्‍या समस्यांबाबत अधिकार्‍यांना तातडीने जिल्हा विकास नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी दिली. तहसील कार्यालयातून आवश्यक असलेल्या दाखल्याची समस्या दूर करण्यासाठी याच महिन्यात एका अर्जावर अनेक दाखले उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. जमिनींच्या मोजणीबाबतचे बहुतांश प्रकरणे आता निकाली निघत आहेत. रोव्हर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाल्याचे मंत्री विखे पा. यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शासनाच्या वाळू विक्री केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 600 रुपयात वाळू मिळत आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना अद्यापि मिळाली नाही. त्याचे गांभिर्य सरकारला निश्चित आहे. याच आठवड्यात ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

1 रुपयात विमा , प्रभावी अंमलबजावणी..!

पीक विमा योजनेबाबत शेतकर्‍यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. आता सरकारनेच तुमच्या पिकाचा 1 रुपयात विमा उतरविण्याचा निर्णय घेतल्याने या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, असा विश्वास मंत्री विखे पा. यांनी व्यक्त केला.

Back to top button