नगरमध्ये अवैध धंद्यांना आले 'अच्छे दिन', बिंगो, मटका जोमात | पुढारी

नगरमध्ये अवैध धंद्यांना आले 'अच्छे दिन', बिंगो, मटका जोमात

नगर, पुढारी वृत्तसेवा: तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी ‘डीबी’ अर्थात गुन्हे शोध पथक स्थापन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहेच, शिवाय अवैध धंद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. चैन स्नॅचिंग, चोर्‍या, दुचाकी चोर्‍या नित्याच्याच झाल्या आहेत; त्यामुळे गुन्हे शोध पथकाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांवर वचक राहावा तसेच गुन्ह्यांचे डिटेक्शन चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी गुन्हे शोध पथक स्थापन करण्यात येते. तोफखाना पोलिस ठाणे शहरातील उपनगरांच्या दृष्टीने महत्त्वाचे पोलिस ठाणे आहे. या ठाण्याची धुरा काही महिन्यांपूर्वीच पोलिस अधीक्षक यांनी पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या खांद्यावर दिली. साळवे यांनी पदभार घेताच डिटेक्शन ‘चांगले’ व्हावे, यासाठी गुन्हे शोध पथकाचे कारभारी आणि काही कर्मचारी बदलले. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख म्हणून एपीआय नितीन रणदिवे यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यानंतर काही दिवस पथकाने चांगली कामगिरी करत गुन्हेगारांना ‘खाकी’चा हिसका दाखविला. मात्र, पथकाच्या कामाची चमक काही दिवसच दिसली. त्यामुळे सुरुवातीला केलेल्या कारवाया ‘नेमक्या कशासाठी होत्या’? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बिंगो, मटका जोमात

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिंगो, मटका जुगारासह अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची बिंगो, मटका, हुक्का अशा अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू आहे. मात्र, तोफखाना पोलिसांकडून कुठेही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे डीबी पथकाच्या अवैध धंदे दृष्टीस कसे पडत नाहीत, याची चर्चा आहे.

तपासाकडे दुर्लक्ष

गुन्हे शोध पथकात काही कामचुकार कर्मचारी अधिकार्‍यांशी सलगी ठेवून पथकात स्थान बळकावतात. याच कर्मचार्‍यांची कार्यशैली गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे. गुन्ह्याचा तपासाकडे दुर्लक्ष करून केवळ अवैध धंद्यांच्या आडून गोड फळे चाखण्यावर या कर्मचार्‍यांचा भर असतो.

Back to top button