नगर: सावित्रीबाईंच्या बदनामी निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने | पुढारी

नगर: सावित्रीबाईंच्या बदनामी निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

नगर, पुढारी वृत्तसेवा: भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईट विरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कायदा अस्त्विात यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केली.

इंडिक टेल्स नामक वेबसाईटवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी निदर्शने केली. यावेळी आमदार जगताप म्हणाले की, सत्ताधारी आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्याचे काम करत आहे. अशाच प्रकारे हे घाणेरडे काम करण्यात आले आहे. तो पक्ष महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर कोणतीही भूमिका घेत नाही व कारवाईही करत नाही. हे कृत्य आपल्या पक्षांतील कुणाकडून झाले असते, तर त्या पक्षाने कायद्यात न बसणारे कलमे लावून त्यांना जेलमध्ये घालण्याचे काम केले असते. त्या पक्षात प्रवेश केला तर जणू काही त्यांना असे काम करण्यास लायसन्स मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचे पुतळे जाळून, त्यांची धिंड काढून त्यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचे काम आपल्या सर्व समविचारी पक्षांनी व नागरिकांनी केले पाहिजे. त्यानंतरच त्यांचे तोंड बंद होतील. त्या पक्षातील व्यक्तींशी निगडीतच ही वेबसाईट असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला.

इंडिक टेल्स नामक वेबसाईटवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत आक्षेपार्ह केलेले लिखाण वेदनादायी व निंदनीय आहे. छत्रपती फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याचे प्रा. माणिक विधाते यांनी म्हटले.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अभिजीत खोसे, अंबादास गारुडकर, संजय सपकाळ, प्रा. अरविंद शिंदे, अनंत गारदे, रेश्मा आठरे, गजेंद्र भांडवलकर, दादा दरेकर, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, अशोक गोरे, वैभव ढाकणे, गणेश बोरुडे, लहू कराळे, मयुर भापकर, बाबासाहेब गारुडकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Back to top button