नगर: कारची काच फोडून रोकड पळविणारे अटकेत

नगर, पुढारी वृत्तसेवा: कारची काच फोडून तेरा लाखांची रोकड चोरणार्या आंतरराज्यीय सराईत आरोपींना एलसीबीने अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे घरासमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून आरोपींनी रोकड पळविली होती. एलसीबीच्या पथकाने आरोपींचा मागमूस काढत एकाला कर्नाटकातून तर एकाला कर्जत बसस्थानकावरून ताब्यात घेतले.
गोविंद ऊर्फ गोपी रमेश शिंडे (वय 25), अंजी अर्जुन बलोत ऊर्फ कट्टा (वय 45, दोघेही, रा.कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बेनवडी (ता.कर्जत) येथील अतुल नवनाथ गदादे (वय 33) यांच्या घरासमोर लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तेरा लाखांची रोकड पळविली होती. तपास करीत असताना एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, गोपी शिंडे व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे. आरोपी शिंडे याला अटक करण्यासाठी एलसीबीचे पथक कर्नाटकात गेले. आरोपी शिंडे याचा पत्ता काढून त्याला पथकाने टोमॅटो मार्केट येथून अटक केली. इतर आरोपींबाबत विचारपूस केली असता हा गुन्हा त्याचे साथीदार अंजी कट्टा, रघू अंजी कट्टा, देवराज कृष्णाअप्पा शिंडे, कुमार अंजी बलोत, मल्लम्मा ऊर्फ पद्मा अंजी कट्टा (सर्व रा.कर्नाटक) यांनी मिळून केल्याची कबुली दिली. एलसीबीच्या पथकाने त्यानंतर एका आरोपीला कर्जत बसस्थानकाजवळून दुसर्या आरोपीला ताब्यात घेतले. तर, दोन आरोपी दुचाकीवरून पळून गेले. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार सुरेश माळी, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, सागर ससाणे, रोहित येमूल, भाऊसाहेब काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांनी ही कारवाई केली.