नगर: तीन वर्षांनंतरही ‘आयुष’ अपूर्णच..! बांधकाम झालं; निधीअभावी फर्निचर, विद्युतीकरण अडले | पुढारी

नगर: तीन वर्षांनंतरही ‘आयुष’ अपूर्णच..! बांधकाम झालं; निधीअभावी फर्निचर, विद्युतीकरण अडले

नगर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांअंतर्गत नगरमध्ये 8 कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेले 30 खाटांचे आयुष रुग्णालय तीन वर्षानंतरही अद्यापही अपूर्णच आहे. बांधकाम शेवटच्या टप्प्यात असले, तरी निधी नसल्याने विद्युतीकरण व फर्निचरचे काम आडले आहे. दरम्यान, जिल्हा नियोजनकडे सुमारे सव्वा कोटींची मागणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांंनी सांगितले. तसा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे गेल्यानंतर व प्रत्यक्षात निधी मिळाल्यानंतरच या कामाला गती मिळणार आहे.

केंद्र शासनाने राज्य वार्षिक कृती आराखडा 2017-18 अंतर्गत पुणे, नंदूरबार, सिंधुदूर्ग आणि नगर या चार ठिकाणी आयुष रुग्णालये उभारण्यास मंजुरी दिलेली होती. रुग्णालयाच्या बांधकामाकरीता 8.99 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 2018-19 च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य दरसुचीनुसार 7 कोटी 31 लाख 63 हजार रुपये अशी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधीक्षक अभियंता व्ही.एल. कांबळे यांनी तांत्रिक मान्यता दिली. या संदर्भात निविदा प्रक्रिया झाली. त्यात हे काम लोणी येथील एका कंपनीला मिळाले. 11 सप्टेंबर 2019 रोजी संबंधित ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. यातील अटीनुसार कार्यारंभ आदेशापासून 12 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. तसेच हे काम पायाभूत सुविधा विकास कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांच्या मार्गदर्शनात करण्याचे कळविले होते. प्रारंभी जागेचा वाद, त्यानंतर कोरोनामुळे कामास विलंब झाला. मुदत संपली तरी अजूनही हे काम अपूर्णच आहे.

अशी असेल रचना !

दुमजली बांधकाम- 33 हजार चौरस फूट.
पहिला मजला- 19 हजार चौफू पहिल्या मजल्यावर- केसपेपर, ओपीडी कक्ष, योग हॉल, पंचकर्माकक्ष .
दुसरा मजला- 17 हजार चौफूट, दुसर्‍या मजल्यावर- शस्त्रक्रिया विभाग, स्त्री-पुरुष स्वतंत्र वार्ड, स्पेशल रुम, लॅबरॉटरी, औषध विभाग, ऑफीस.

सध्या ‘आयुष’ व्हेंटीलेटरवर!

आयुषचे नवीन हॉस्पिटल लवकरच सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या पर्याय म्हणून सिव्हीलमध्ये 40 नंबरमध्ये आयुषची ओपीडी सुरू आहे. दररोज 100 पेक्षा अधिक रुग्णांवर डॉ. मिरीकर यांच्या मार्गदर्शनात पाच वैद्यकीय अधिकारी उपचार करतात. मात्र या ठिकाणी स्वच्छतागृह नाही, इतर सोयीसुविधा नाही, त्यामुळे उपचारावर कोठेतरी बंधने येतात, असेही सूत्रांकडून समजते.

26 जानेवारीचा मुहूर्त हुकला; आता..?

या रुग्णालयात अल्पदरात रुग्णांना आयुर्वेदिक उपचार व औषधे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या रुग्णालयाच्या उद्घाटनाकडे लागल्या आहेत. यापूर्वी 26 जानेवारी 2023 रोजी उद्घाटनाची चर्चा रंगली होती. मात्र काम अपूर्ण असल्याने हा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी या रुग्णालयाचे लोकार्पण होईल का? याकडे लक्ष आहे.

पैसे कमी पडले; पण मागणी केली का?

फर्निचरसाठी 74 लाख 67 हजारांची, तर विद्युतीकरणासाठी सुमारे 45 लाखांहून अधिक रक्कमेची मागणी सिव्हीलकडून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे समजते. मात्र प्रत्यक्षात विद्युतीकरणासाठीच्या निधीची मागणी केल्याचे समजते. फर्निचरसाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहचलेलाच नसल्याचे समजते.

Back to top button