तिजोरीची चावी फडणवीसांकडे, मी फक्त सांगतो; एकनाथ शिंदेंनी सांगितलं सरकारचं अर्थगणित | पुढारी

तिजोरीची चावी फडणवीसांकडे, मी फक्त सांगतो; एकनाथ शिंदेंनी सांगितलं सरकारचं अर्थगणित

पुढारी ऑनलाईन: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार ३१ मे रोजी झाला. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासह मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षे सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोणतेही निर्णय घेत नव्हते. आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या दिवसापासून वेगवान निर्णय घेण्यास सुरवात झाली. आमचे सर्व निर्णय सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून घेण्यात आले. राज्यातील शेतकरी सुखी झाला पाहिजे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. निळवंडे धरणाचे काम गेली ५३ वर्षे रखडले. बरं झालं आपलं सरकार आलं, त्यामुळे तरी ते मार्गी लागले. अन्यथा अजूनही ते रखडले असते. या धरणाच्या उर्वरित कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसही येथे आहेत. त्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत. मी फक्त त्यांना सांगतो, ते लगेच तिजोरी उघडून पैसे देतात. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही कोणतीही चिंता करू नये, त्यांना मोबदला आणि पुढील कामासाठी निधी मिळणार यात शंका नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यापूर्वीच्या सरकार लकवा झाल्याने निर्णय घेत नव्हते. आमचे सरकार आल्यापासून वेगाने निर्णय व्हायला लागले आहेत. नगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प हा माझ्या जन्माच्या आधीचा आहे. त्यावेळी आठ कोटींचा असलेला प्रकल्प आता पाच हजार कोटींचा झाला. या धरणाच्या १९९५ मधील युतीच्या सरकारच्या काळात गती मिळाली. नंतर २००३ ते २०१७ पर्यंत तो रखडला. २०१७ मध्ये या प्रकल्पाला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि कामाने गती घेतली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधीपक्ष नेते होते. त्यांनी तसेच मधुकर पिचड यांनी यासाठी मोठे सहकार्य केले, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या धरणाच्या बाबतीत यापूर्वी काय झाले, ते आता कालव्यातून वाहत असलेल्या पाण्यासोबत सोडून देऊ. स्वच्छ मनाने पुढे जाऊन काम करीत राहू, असे विखे पाटील यांनी म्हटले.

Back to top button