दक्षिण नगर जिंकण्यासाठी शरद पवारांचं प्लॅनिंग; उमेदवारीसाठी लंकेंसह 'या' नावांची चर्चा | पुढारी

दक्षिण नगर जिंकण्यासाठी शरद पवारांचं प्लॅनिंग; उमेदवारीसाठी लंकेंसह 'या' नावांची चर्चा

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्टवादीची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक मंगळवार ३० मे रोजी मुंबईत झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वरिष्ठ नेते आणि मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पारनेरचे आमदार निलेश लंके हे उमेदवार असतील, असे मानले जात आहे. मात्र, आज पक्षाच्या बैठकीत त्यांच्यासह अन्य नावांवरही चर्चा झाली. उमेदवाराला तयारीसाठी वेळ मिळावा, यासाठी उमेदवार लवकर ठरवा, अशी मागणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत संभाव्य उमेदवारांवरही चर्चा झाली. अहमदनगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. मागील निवडणुकीवेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे सुजय विखे पाटील यांच्यात लढत झाली. काँग्रेसमधून भापजपमध्ये प्रवेश केलेले सुजय विखे पाटील या निवडणुकीत विजयी झाले.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात त्यावेळी स्वत: पवार यांनी लक्ष घालून प्रचार केला होता. त्यामुळे या निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचा, अशी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापनादिनाचा मेळावाही ९ जूनला नगरला ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आमदार लंके यावेळी लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत अनेक दिवसांपासून मिळत आहेत. मात्र, आजच्या बैठकीत आमदार लंके यांच्यासोबतच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच श्रीगोंद्याचे गेल्या विधानसभेला थोडक्यात पराभव झालेले घनःश्याम शेलार यांच्या नावांचीही चर्चा झाली. पक्षाला जो कोणी उमेदवार द्यायचा असेल तो लवकर द्यावा, म्हणजे तयारी सुरू करता येईल, अशी मागणीही जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, या बैठकीला नगरमधून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी उपस्थित होते. चौंडी येथील कार्यक्रमाच्या तयारीमुळे आमदार रोहित पवार आणि कुटुंबातील लग्न समारंभामुळे आमदार निलेश लंके या बैठकीला उपस्थित नव्हते.

Back to top button