आमदार राम शिंदेंसह कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी | पुढारी

आमदार राम शिंदेंसह कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी

जामखेड: कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकदार बनला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावरून तो अधिक पेटलेला असतानाच राम शिंदे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यांना धमकी देणारा तरूण आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात नगरसेवक अमित अरुण चिंतामणी (रा. जामखेड) यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर सुभाष गवसणे (रा. पिंपळगाव उंडा, जामखेड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवसणे याने फोन करून तसेच फेसबुकवर व्हिडिओद्वारे धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. गवसणे हा रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापले आहे.

नगरसेवक चिंतामणी यांच्या मोबाइलवर एका नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्ती तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा, नाहीतर पाहून घेईन असे म्हणाला. चिंतामणी यांनी हा प्रकार आमदार राम शिंदे यांना सांगितला. तेव्हा चिंतामणी यांना समजले की, सागर गवसणे याने फेसबुक लाइव्ह करत धमकी दिली आहे. चिंतामणी यांनीही तो व्हिडिओ पाहिला आणि पोलिसांत तक्रार दिली. धमकीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जामखेड पोलिसांनी चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून सागर सुभाष गवसणे (रा. पिंपळगाव उंडा, जामखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Back to top button