संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरातून जाणाऱ्या जोर्वे रोडवरती वाहतूक कोंडी झाली होती. त्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जोर्वेतील एका वाहन चालकाने 'हॉर्न' वाजवला. म्हणून राग आल्याने परिसरातील 25 ते 30 जणांनी वाहनचालकासह अन्य तिघांना बेदम मारहाण केली. सदर घटनेबाबत जोर्वेतील अन्य चौघांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्याचाही राग मनात धरुन त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास जोर्वेकडे निघालेल्या 'त्या' चौघांना पुन्हा त्याच ठिकाणी शंभर ते दीडशे जणांच्या टोळक्याने तलवारी, चॉपर, रॉड आणि लाकडी दांडक्यांचा मुक्त वापर करत अमानुषपणे मारहाण केली. या घटनेत आठजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १०० ते १५० जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह भारतीय शस्त्र कायदानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र,अद्याप एकालाही पोलिसांनी अटक केलेली नाही.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील जोर्वेनाका येथून जोर्वे गावाकडे जात असणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं असल्यामुळे या भागामध्ये वारंवार वाहनांचा खोळंबा होत असतो. रविवारी साडे सहा वाजता संगमनेरात पशुखाद्य खाली करुन जोर्वेकडे जाणार्या पिकअप वाहनाच्या चालकाने 'हॉर्न' वाजविला म्हणून बाबु टपरीवाला, इम्रान वडेवाला,नदीम हुसेन शेख, इम्रान युसुफ (पेंटरचा मुलगा), रियाज जहीर शेख (रिक्षा वाला), राहीफ व साफीक (चहावाला) यांच्यासह 20 ते 25 जणांची त्या वाहन चालकासोबत हमरीतुमरी झाली.त्यानंतर जमावाने वाहनातील सुमीत पोपट थोरात, तन्मय नानासाहेब दिघे, विजय मंजाबापू थोरात व कुंडलिक दिघे या चौघा तरुणांना बेदत मारहाण केली. त्यानंतर हे चौघेही जोर्वे गावात गेले. त्यांनी घडला प्रकार गावातील तरुणांना सांगितला. त्यामुळे जोर्वेतही तणाव निर्माण झाला.
आपल्या गावातील तरुणांना जोर्वे नाका परिसरातील तरुणांनी मारहाण केल्याची माहिती समजताच जोर्वे गावचे माजी उपसरपंच गोकूळ गणपत दिघे, रविंद्र नामदेव गाडेकर, बाबा साहेब शिवाजी थोरात, जितेंद्र कैलास शिंदे, अजय भिमाजी थोरात आणि गणेश बंडोपंत काकड यांनी संगमनेर शहर पोलीसात या घटनेची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आणि त्या चौघांना उपचारार्थ एका खाजगी दवाखान्यात दाखल केले.
संगमनेरहून तीन दुचाकींवरुन सहाजण जोर्वे गावाकडे निघाले असता जोर्वे नाक्यावरील वळणाच्या रस्त्यावर शंभर ते दीडशे जणांचा सशस्त्र जमाव हातात तलवारी, चॉपर, लोखंडी फायटर, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन त्या सहा जणांवरती चालून आला. 'ये वहीं लोग है, जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन में तक्रार करने गये थे. आज इनकों जिंदा घर नहीं जाने देंगे!' असे म्हणत इरफान व इम्रान वडेवाला आणि त्यांच्याडे काम करणारे तिघे जण, बाबु टपरीवाला, अकील टपरीवाला, नदीम हुसेन, ताहीर नजीर पठाण, शाहीद वाळुवाला, मुसेफ शेख, मुज्जू, फय्युम फिटर, राहीफ, साफीक चहावाला व एफ्फूखान वडेवाला यांच्यासह काही जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत इरफान वडेवाला याने रविंद्र गाडेकर यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, तर आराफत रफिक शेख याने हातात असलेल्या धार दार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. यावेळी इरफान वडेवाल्याच्या तिघा कामगारांनी तलवार, लोखंडी फायटर व रॉडने बाबासाहेब शिवाजी थोरात याच्या डोक्यावर, हातावर व पायावर वार केले, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला गंभीर जखमी केले. मुज्जू व फय्युम फिटरने लोखंडी फायटर व लाकडी दांडक्याने अजय भिमाजी थोरात याच्यावर हल्ला करुन त्याला जखमी केले. अकील टपरीवाला, नदीम हुसेन, ताहीर नजीर पठाण व शाहीद वाळुवाला या चौघांनी जितेंद्र कैलास दिघे याला सुद्धा लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.
जोर्वे येथील अनेकजण व शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गांभीर्याने दखल घेतली असून शहरात अतिरीक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेने जोर्वेनाका आणि जोर्वे गावात तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत जखमी असलेल्या रविंद्र नामदेव गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील 100 ते 150 जणांवर जीवे ठार माण्याचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्राने हल्ला, भारतीय शस्त्र कायदा व दंगलीच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून दंगेखोरांचा शोध सुरु असून कायदा हातात घेणार्या कोणा चीही गय केली जाणार नाही. सध्या जोर्वे नाका व जोर्वे गावात पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे
जोर्वे नाका परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी संगमनेर ते जोर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्यानेच होत असते. या अतिक्रमणामुळे रविवारचा प्रकार घडला आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्या भागात किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमण काढून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. नेमके हे अतिक्रमण काढ ण्यास कोण विरोध करते याचा नगरपालिकेने शोध घ्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
जोर्वे नाका परिसरात जोर्वे गावच्या तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेचे पडसाद सकाळी जोर्वे गावात उमटले आहेत. रात्रीच्या घटनेने संतप्त झालेल्या जोर्वेतील तरुणांनी सकाळी गावातील चिकन विक्रेते व दुचाकी दुररुस्ती करणार्यांच्या टपर्यांमधील सामान बाहेर काढून पेटवून देण्यात आले. तसेच एका गॅरेजमधील दुरुस्तीसाठी असणारे मोटरसायकल ही पेटवून देण्यात आली. जोर्वे ते संगमनेर या तीन किलोमीटरच्या अंतरावर दिवस भर चालणार्या शटल रिक्षाही सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या.