कर्जत : आ. रोहित पवारांची चौंडीतील यात्रा रद्द; जयंती साजरी करणार | पुढारी

कर्जत : आ. रोहित पवारांची चौंडीतील यात्रा रद्द; जयंती साजरी करणार

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवार यांच्या वतीने 31 मे रोजी काढण्यात येणार्‍या यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काही झाले तरी यात्रा काढणारच असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र, जयंती उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी त्यांनी ही यात्रा रद्द केली असून, 30 मे रोजी चोंडी येथे महापूजेचा आयोजन करण्यात आले आहे.

आमदार पवार यांनी यांनी शनिवारी याबाबत सविस्तर भूमिका मांडली. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गेल्या वर्षी आम्ही पूर्णतः अराजकीय पद्धतीने साजरी केली होती. यंदाही तसेच नियोजन केले होते. त्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, राजकीय दबावाखाली प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत जयंती साजरी करण्यासह शोभायात्रा काढण्यावर आम्ही ठाम होतो. तसे प्रशासनाला सूचितही केले होते.

मात्र, जयंती कार्यक्रमात काही समाजकंटक जाणूनबुजून खोडा घालून सामाजिक तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगत 31 मे रोजी यात्रा न काढण्याची विनंती प्रशासनाने आम्हाला केली. समाजकंटकांचा हेतू साध्य होऊ नये, यासाठी आम्ही प्रशासनाची विनंती मान्य करीत यात्रा रद्द केली आहे.

आता 30 मे रोजी रात्री 9 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत महापूजा आणि सात नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक करणार आहोत. तसेच, 31 मे रोजी देशभरातून येणार्‍या भाविकांसाठी विश्रांतीची व्यवस्था, महाप्रसादाचे आयोजन, आरोग्य व्यवस्था आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

‘राघोबा दादां’शी सामना करू

यात्रेला परवानगी नाकारत आधुनिक ‘राघोबा दादां’नी वेढा टाकला असला तरी, आमच्या मनातील अहिल्यादेवींची शिकवण या राघोबा दादांना कदापि रोखता येणार नाही. या प्रवृत्तींचा सामना कसा करायचा, याची शिकवण अहिल्यादेवींच्या विचारांना मानणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असेही आमदार पवार म्हणाले.

Back to top button