नगर: विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये महाविद्यालयात राडा! | पुढारी

नगर: विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये महाविद्यालयात राडा!

देवळाली प्रवरा (नगर), पुढारी वृत्तसेवा:‘माझ्याकडे पाहून का हसलास’ असे विचारले असता दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. तसेच एका तरुणावर ब्लेडने वार करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राजश्री शाहू महाविद्यालय परिसरात दिनांक 25 मे रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस पथक वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राजश्री शाहू महाविद्यालय या कॉलेज मधील विकास वाळके व त्याचे काही मित्र दिनांक 25 मे रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान कॉलेज परिसरातून बाहेर निघत होते. तेव्हा आरोपी त्यांच्याकडे पाहून हसले. फिर्यादी विकास वाळके याने त्याला हसण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने कॉलेजच्या कॅन्टीनला येण्यास सांगून फोन लावला आणि इतर आरोपींना बोलावून घेतले. त्यावेळी आरोपींनी विकास वाळके याला मारहाण करून त्याच्यावर ब्लेडने वार केले. विकास वाळके याचे काही मित्र भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या घटनेत आदित्य बाळासाहेब ताजणे याचा 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपींनी बळजबरीने काढून घेतला.

दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे देवळाली प्रवरा परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल होऊन या घटनेतील आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेत विकास बाळासाहेब वाळके, सत्यजित संभाजी देठे, मयूर राजेंद्र शिणारे, आदित्य बाळासाहेब ताजणे (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) हे तीन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास बाळासाहेब वाळके याच्या फिर्यादीवरून आरोपी किरण ऊर्फ गण्या उत्तम पठारे(रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) तसेच निलेश ऊर्फ पप्पू सांगळे, कार्तिक गणेश जाधव, मयूर चक्रपाणी खैरे (तिघे रा. टाकळीमिया, ता. राहुरी) या चार जणांवर मारहाणीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button