पेट्रोल पंप डिझेल चोरी प्रकरणातील तीन चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई | पुढारी

पेट्रोल पंप डिझेल चोरी प्रकरणातील तीन चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील लोहारे शिवारात साई बालाजी पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांच्या डिझेलची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी अहमदनगर जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन जेरबंद केली.

याबाबत संगमनेर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील लोहारे कासारे शिवारात नांदुर-शिंगोटे ते लोणी रोडवर प्रवीण सिद्धराम दिड्डी यांच्या मालकीचा एचपी कंपनीचा साई बालाजी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाचे कर्मचारी १८ मे रोजी सायंकाळी केबिनमध्ये झोपलेले असताना अनोळखी असलेल्या चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील ३ लाख ५२ हजार ३३३ रुपये किंमतीचे ३ हजार ७८० लिटर डिझेलची चोरी केली होती. याबाबत पेट्रोल पंपाचे मॅनेजर मनोज झांबरे यांनी संगमनेर तालुका पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करत संगमनेर तालुक्यातील लोहारे कासारे परिसरातील साई बालाजी पेट्रोल पंपावरील डिझेल चोरी प्रकरणाचा गुन्हा उघडकिस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील जोगेश्वरी वस्ती येथे मुरलीधर पिंटु शिंदे, अर्जुन व्यंकटपवार (रा.जोगेश्वरी वस्ती, ता.वाशी, जि उस्मानाबाद) आणि पोपट व्यंकट पवार (रा. येरमाळा, ताकळंब जि उस्मानाबाद) या तीन जणांच्या पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेला १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक व २६ हजार ३२० रुपये किंमतीचे २८० लिटर डिझेल असा एकुण १५ लाख २६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Back to top button