नेवासा : पोलिस चौकी बनली वेड्यांचे विश्रामगृह! | पुढारी

नेवासा : पोलिस चौकी बनली वेड्यांचे विश्रामगृह!

संदीप वाखुरे

नेवासा फाटा(अहमदनगर) : नगर-औरंगाबाद महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेवासा फाटा (मुकिंदपूर) येथील दुरक्षेत्र पोलिस चौकीचे काम रखडले आहे. त्यामुळे ही पोलीस चौकी सध्या वेडे व भिकार्‍यांचे आश्रयस्थान बनले आहे. या ठिकाणी दररोज चार ते पाच भिकारी आणि वेडे रात्रीच्या वेळी आश्रय घेताना दिसत आहेत.

नेवासा फाटा हे मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते. याठिकाणी पोलिस चौकी असावी, अशी मागणी गेल्या पंचवीस वर्षांपासूनची आहे. चौकीसाठी नेवाशाचे तत्कालीन सरपंच स्व. रामभाऊ पोतदार यांनी जागा देण्याचे कबूल केले. मात्र, चौकी झाली नाही. तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजित ढेरे यांनी चौकीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे यांनी ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध करून दिली.

नेवासा फाटा येथील सर्व छोटे-मोठे व्यापारी, नागरिक, विविध तरूण मंडळांनी पैसे आणि वस्तू स्वरूपात वर्गणी देऊन सहकार्य केले. लोकवर्गणी गोळा करून ही पोलिस चौकी राजमुद्रा चौकात उभी राहिली खरी. मात्र, पुढे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. चौकी उभी राहूनही खिडक्या आणि दरवाजे बसविले नाहीत. फरशी व रंगरंगोटीचे काम बाकी आहे. त्यामुळे हे ठिकाण सध्या मुक्या प्राण्यांसह भिकारी तसेच वेड्यांचे विश्रामगृह बनले आहे.

रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटना घडतात. मात्र, नागरिक, तसेच प्रवाशांना मदतीसाठी कोणी सापडत नाही. पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांकही कुठे नाही. पोलिस चौकी लवकर सुरु झाल्यास महामार्गावरील रस्तालूट, चोर्‍या, घरफोड्याला आळा बसून व्यापार्‍यांनाही संरक्षण मिळणार आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय करे यांनीही प्रयत्न केले. मात्र, पुढे वरिष्ठांनीही याकडे सोयीस्करपणे नियम व अटीवर बोट ठेवत दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिस चौकीची अवस्था जैसे थे आहे.

परवानगीसाठी ठराव : सरपंच निपुंगे

पोलिस चौकीच्या परवानगीसाठी रीतसर ठराव करून पोलिस निरीक्षकांना पाठविला आहे. चौकीचे उर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत व नागरिक मदतीस तयार आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे. अवैध धंदे, चोर्‍या कमी होण्यासाठी प्रत्येक चौकात कॅमेरे बसविण्याचा मानस असल्याचे सरपंच सतीश निपुंगे यांनी सांगितले.

Back to top button